मुंबई : मुंबईत 11 जुलै 2006 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटातील जखमी पराग सावंतला अखेर मृत्यूनं कवटाळलं आहे. गेली 9 वर्ष पराग कोमात होता. हिंदुजा रुग्णालयाच्या 8 मजल्यावरच्या बेड नंबर 27 वर तो मृत्यूशी झुंज देत होता. अखेर आज त्याची झुंज अपयशी ठरली.
स्फोटांच्या दिवशी पराग कामावरून घरी जात असताना स्फोट झाले. त्यात परागच्या मेंदूला गंभीर इजा झाली. 12 जुलैला 2006ला परागला हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेव्हापासून हिंदूजातले न्यूरोसर्जन बी के मिश्रा यांच्या नेतृत्वात त्याच्यावर उपचार सुरू होते.
मधल्या काळात परागची प्रकृती सुधारली होती. पराग नातेवाईकांना ओळखू येऊ लागला होता. पण गेल्या काही दिवसांपूर्वी प्रकृती ढासळली आणि तो पुन्हा एकदा कोमात गेला. त्यानंतर मात्र त्यानं पुन्हा प्रकाश पाहिला नाही. आज सकाळी परागनं अखेरचा श्वास घेतला, तो त्याच 27 नंबरच्या बेडवर.
पश्चिम रेल्वेच्या सात स्थानकांवर 11 जुलै 2006 रोजी झालेल्या स्फोटांना 5 दिवसांनी नऊ वर्ष पूर्ण होतील. अजूनही आरोपींनी शिक्षा झालेली नाही. पण बळींची संख्या मात्र आजही वाढतेय. या स्फोटात जबर जखमी झालेल्या पराग सावंत या तरुणाचा मृत्यू झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.