‘पवार’फूल गेम यशस्वी… महाराष्ट्रातही तीन पायांची शर्यत!

कुरघोडीच्या राजकारणातील धूर्त नेते म्हणून सर्वपरिचित असलेल्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची खेळी अखेर यशस्वी झालीय. महाराष्ट्र विधिमंडळात भाजपनं अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतलाय. त्यामुळे, आता महाराष्ट्रातही भाजप, अपक्ष आणि राष्ट्रवादी अशी तीन पायांची शर्यत दिसून येणार आहे. 

Updated: Nov 12, 2014, 01:22 PM IST
‘पवार’फूल गेम यशस्वी… महाराष्ट्रातही तीन पायांची शर्यत! title=

मुंबई : कुरघोडीच्या राजकारणातील धूर्त नेते म्हणून सर्वपरिचित असलेल्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची खेळी अखेर यशस्वी झालीय. महाराष्ट्र विधिमंडळात भाजपनं अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतलाय. त्यामुळे, आता महाराष्ट्रातही भाजप, अपक्ष आणि राष्ट्रवादी अशी तीन पायांची शर्यत दिसून येणार आहे. 

राष्ट्रवादीनं आपला पाठिंबा काढून घेतला तर फडणवीस सरकार पडण्याची शक्यता कायम आहे... ही टांगती तलवार येती पाच वर्ष भाजपच्या डोक्यावर कायम राहील. ही परिस्थिती ओढवली जाऊ नये, यासाठी राष्ट्रवादीला अनुसरून भूमिका घेणं फडणवीस सरकारला भाग पडणार आहे. त्यामुळे, भाजपला प्रत्येक पावलाला ‘राष्ट्रवादी’ची मदत गरजेची असेल.

फडणवीस सरकारनं पाठिंबा न मागताच पवारांनी अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या पाठिंबा देण्यास तयार असल्याचं जाहीर केलं. त्यावर, भाजपनं कधीही हा प्रस्ताव उघडपणे मान्य केला नसला तरी धुडकावूनही लावला नव्हता. उलट, पाठिंबा दिला तर घेऊ अशीच भाजपची भूमिका दिसली. त्यामुळे, सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणं यांसारखी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत राष्ट्रवादीवर प्रखर टीका करत दोषींवर कडक कारवाई करण्याचं आश्वासन देणारं फडणवीस सरकार राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतंत कसं? असा प्रश्न भाजपवर विश्वास टाकणाऱ्या सामान्य जनतेला पडलाय. पण, म्हणतात ना राजकारणात काहीही वर्ज्य नसतं... 

आता, पुढची पाच वर्ष राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा कायम ठेवणार की मध्येच पाठिंबा काढून घेणार? सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होणार? भाजपला ही गणितं कशी सोडवता येतील किंवा नाही? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं भविष्यकाळात मिळणार आहेत. 

राष्ट्रवादी प्रत्यक्षपणे सत्तेत सहभागी होणार?
आता, भाजपचा खरा सामना होईल तो राजकारणात मुरलेला खेळाडू असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी... सरकार स्थिर ठेवण्यासाठी भाजप आता राष्ट्रवादीला मंत्रिमंडळात सहभागी करून सत्तेत प्रत्यक्षपणे सहभागी करून घेणार का? हेही लवकरच दिसून येईल. 

शरद पवार आणि भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांचे संबंध काही महाराष्ट्राला नवे नाहीत... त्यामुळे अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणाऱ्या भाजपनं राष्ट्रवादीला प्रत्यक्ष सरकारमध्ये सहभागी करून घेतलं तरी आश्चर्य वाटायला नको...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.