मुंबई : राज्यातील नव्या सरकाराचे 100 दिवस पूर्ण होत असतानाच सरकारमधील सत्तास्पर्धा तीव्र झाली आहे. भाजपाने शिवसेनेला सत्तेत बरोबर घेतले असले तरी जिथे संधी मिळेल तिथे शिवसेनेच्या मंत्र्यांना दाबण्याचा प्रयत्न भाजपाकडून आणि मुख्यमंत्र्याकडून सुरू आहे, तशी चर्चा आहे. अनेकजण नाराज असल्याचे दिसत आहे.
राज्यातील नवं सरकार स्थापन होऊन येत्या शनिवारी 100 दिवस पूर्ण होत आहेत. शिवसेना-भाजपा हे दोन पक्ष या सरकारमध्ये एकत्र नांदत आहेत. मात्र या सरकारचा संसार सुखाचा नाही हे स्पष्ट झालंय. 100 दिवसातच भांडयाला भांडं लागू लागलं आहे. याचं प्रमुख कारण म्हणून आक्रमक स्वभाव असलेल्या शिवसेनेला दाबवण्याचा आणि शिवसेनेच्या मंत्र्यांना डावलण्याचा प्रयत्न भाजपाकडून सातत्याने सुरू आहे.
याचं ताजं उदाहरण म्हणजे दोन दिवसांपूर्वी पर्यावरण विभागाची पार पडलेली बैठक... मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी पर्यावरण विभागाची बैठक बोलवली होती. या बैठकीला केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीला राज्याच्या पर्यावरण विभागाचे सचिव अजय मेहताही उपस्थित होते. या बैठकीत पर्यावरणामध्ये अडकलेल्या प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली. मात्र या बैठकीची कल्पनाच राज्याच पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना नव्हती. आपल्या खात्याची बैठक घेताना आपल्यालाच डावलल्याप्रकरणी रामदास कदम तीव्र नाराज असल्याचे समजते.
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबत रामदास कदम तक्रार करणार असल्याचे समजते. एकीकडे शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या खात्यात थेट मुख्यमंत्री हस्तक्षेप करत असताना शिवसेनेचे राज्यमंत्रीही तीव्र नाराज आहेत. भाजपाच्या कॅबिनेटमंत्र्यांनी शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना अधिकारच दिलेले नाहीत. त्यामुळे मंत्री असूनही काम नाही अशी अवस्था शिवसेनेच्या कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांचीही झाली आहे. याबाबत आता शिवसेनेचे काही मंत्री उघडपणे नाराजी व्यक्त करतायत.
शिवसेनेबरोबरच मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीबाबत भाजपाच्या मंत्र्यांमध्येही नाराजी आहे. या आठवड्यात पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीला गैरहजर राहून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी दाखवून दिली आहे. खडसे यांच्या महसूल खात्यात अधिकारी नेमताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केली नव्हती, तर दुसरीकडे खडसे यांच्या कार्यालयात सध्या कार्यरत असलेल्या स्वीय सचिव आणि स्वीय सहाय्यक यांच्या नियुक्त्यांवरूनही खडसे नाराज असल्याचे समजते. आपण नाराज नाही असं खडसे सांगत असले तरी मग ते मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर का राहिले हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
सरकारमध्ये एकत्र असूनही शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष शिगेला पोहचण्याची चिन्हं आहेत. तर दुसरीकडे भाजपाच्या काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात दंड थोपटले आहेत. सरकारला 100 दिवस पूर्ण होत नाहीत तोच सरकारमधील सत्ता स्पर्धा समोर येत आहे. जलद विकास आणि स्वच्छ प्रशासनाची ग्वाही देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या सत्तास्पर्धेचे चटके बसू लागलेत. या सत्तास्पर्धेत मुख्यमंत्र्यांना शिवसेनेबरोबरच स्वपक्षीयांचाही सामना करावा लागतोय. हा सत्तासंघर्ष मिटवण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्र्यांसमोर आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरून महसूल मंत्री एकनाथ खडसे नाराज असल्याची चर्चा आहे. मुंबईत हजर असूनही खडसे मंगळवारी कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहिले. खडसेंच्या आजारपणाचं कारण आता त्यांच्या कार्यालयाकडून पुढं करण्यात आलंय. पण आज सह्याद्री अतिथीगृहावरची ही दृश्यं पाहिल्यानंतर फडणवीस आणि खडसेंचे संबंध कसे आहेत, याची सहज कल्पना येईल.. राज्यपालांची वाट पाहत मुख्यमंत्री फडणवीस आणि खडसे एकमेकांच्या अगदी जवळ उभे आहेत, पण त्यांच्यामध्ये किती संवाद होतोय, हे प्रेक्षकांच्या लक्षात येईल.. राज्यपाल आल्यानंतर दोघे दोन बाजूंनी चालत कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.