www.24taas.com, मुंबई
महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. येत्या 15 दिवसांत मुंबईत महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा दलाची स्थापना करण्यात येणार आहे. गृहमंत्री आर आर पाटील यांनी माहिती दिलीये. महिला अत्याचाराच्या सर्व तक्रारी या विशेष पथकाक़डं दाखल केल्या जाणार आहेत. अत्याचारासंबधी किंवा महिलांच्या मदतीसाठी 103 क्रमांकाची हेल्पलाईन सुरु करण्यात आलीये.
या हेल्पलाईनवर कॉल केल्यास केवळ 7 मिनिटांत घटनास्थळी पोलिसांची मदत दाखल होणार आहे. रात्री अपरात्री घरी जाताना महिलांना भीती वाटल्यास महिला या हेल्पलाईनवर कॉल करु शकतात. हेल्पलाईनची टीम महिलांना सुरक्षित स्थळी पोहचवण्याची जबाबदारी पार पाडणार आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आक्रमक उपाययोजना करणार असल्याचं सांगितलं.
मुलींची छेड काढणा-यांना लाथा बुक्क्यांनी मारा..... मुंबई पोलीस तुम्हाला सहकार्य करतील असंही पोलीस आयुक्त सत्यपालसिंह यांनी सांगितलयं. शिवाय अत्याचाराच्या प्रकरणात जो पोलीस पीडित महिलेची उलटतपासणी करेल त्याची उचलबांगडी करण्यात येईल असंही पोलीस आयुक्तांनी यांनी सांगितलंय.