मुंबई : राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये असलेली शिक्षक भरती वरील बंदी उठवण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. शाळांचे संच मान्यता झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल आणि उर्वरित रिक्त पदांवर तातडीने शैक्षणिक संस्थांना शिक्षक भरतीस परवानगी दिली जाणार आहे.
राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांची शेकडो पदे रिक्त असून विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे असं आमदार रामनाथ मोते यांनी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. यावर एक दोन दिवसात परवानगी आदेश काढणार असल्याचंही शिक्षणमंत्र्यांनी म्हटलं आहे.
राज्यात २ मे २०१२ पासून शिक्षकांच्या भरतीला बंदी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता शिक्षकांच्या भरतीचे आदेश निघणार असल्याने शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.