www.24taas.com, मुंबई
राज्य आणि केंद्रातील भ्रष्ट सरकार हटविल्याशिवाय राहणार नाही, असा संकल्प अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलाय. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी राज्य आणि केंद्रावर तोंडसुख घेतलं.
दिल्लीतील गँगरेप प्रकरणातील बलात्काऱ्यांना फाशीच व्हायला हवी, बलात्कार प्रकरणातील दोषींच्या शिक्षेबाबतच्या कायद्यात बदल व्हायला हवेत, अशी आग्रही मागणीही त्यांनी यावेळी केली. राज्यातील सिंचन घोटाळ्यावर टीका करताना, या सराकारची उचलबांगडी करुन दोषींना तुरुंगात पाठवणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आता आक्रमक झालंय. राज्यातल्या आगामी २०१४च्या निवडणुका भाजप गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात लढणार आहे. या निवडणुकीत मुंबईमध्ये भाजपाला १३ ऐवजी कमीत कमी १६ जागांवर निवडणुका लढवायच्या आहेत. तशी मागणीच या कार्यक्रमाच्यावेळी मुंबई भाजपा अध्यक्ष राज पुरोहित यांनी केलीय. यावेळी मुंबई भाजपाने पक्षाचे व्हिजन २०१४ सादर केले. २०१४मध्ये लोकसभेत आणि राज्यात सत्तापरिवर्तन करणार असल्याचा विश्वास मुंडेंनी व्यक्त केलाय.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुंडे यांचं स्वागत करताना कार्यकर्त्यांनी राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून घोषणाबाजीही केली. या कार्यक्रमाच्या निम्तातनं गोपीनाथ मुंडे यांचं रिलाँचिंग करण्यात आल्याची चर्चा आहे. मुंबईतील या कार्यक्रमामुळे पक्ष बळकट करण्यासाठी भाजपने आत्तापासून आक्रमक पावलं उचलली असल्याचं चित्रं दिसतंय.