मुंबई :विधान भवनाच्या आवारात राज्यपाल विद्यासागर राव यांना विरोधी आमदारांनी धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीमध्ये राज्यपालांच्या हाताला जखम झाल्याचं समजतंय. त्या १२ आमदारांना निलंबित करा, असा प्रस्ताव महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत मांडलाय.
माणिकराव ठाकरे, अब्दुल सत्तार, रणजीत कांबळे, विजय वडेट्टीवार, अमर काळे, राहुल बोन्द्रे, जयकुमार गोरे यांच्यासह १२ आमदारांनी राज्यपालांना धक्काबुक्की केल्याचं खडसेंनी सभागृहात सांगितलं. याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. हे फुटेज गटनेत्यांना दाखविण्यात येऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गटनेत्यांशी चर्चा केली.
अभिभाषणाच्या सुरुवातीपासूनच शिवसेना आणि काँग्रेस आमदारांनी राज्यपाल चले जावचे नारे द्यायला सुरुवात केली. संपूर्ण भाषणभर काँग्रेसच्या आमदारांची घोषणाबाजी सुरू होती. घोषणाबाजी करतच काँग्रेसच्या आमदारांनी सभात्याग केला. यावेेळीच धक्काबुक्की झाल्याचे सांगितले जात आहे.
तत्पूर्वी भाजपनं घटनेची पायमल्ली केल्याचा आरोप करत काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी आज विधानभवन परिसरात राज्यपालांची गाडी अडवली. राज्यपालांच्या अभिभाषणाला शिवसेना आणि काँग्रेसचा विरोध आहे. शिवसेनेकडून 'राज्यपाल परत जा' अशा घोषणा देण्यात आल्या. राज्यपालांनी अभिभाषणाला जाऊ नये अशी विनंती काँग्रेसकडून राज्यपालांना करण्यात आली होती. सरकारकडून राज्यपालांच्या निर्देशांची पायमल्ली करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.