दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मराठीत विपुल आणि दर्जेदार बालसाहित्यात आता भर पडणार आहे ती गुलजार यांच्या पुस्तकांची... बोस्कीच्या गोष्टी या मालिकेच्या रुपाने गुलजारांची नऊ पुस्तके मराठी बाल वाचकांच्या भेटीला येत आहेत.
ग्रंथाली प्रकाशन संस्थेने ही पुस्तके मराठीत उपलब्ध करून दिली आहेत. गुलजारांच्या उपस्थितीत येत्या 15 सप्टेंबरला या पुस्तकांचे प्रकाशन ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये होत आहे.
गुलजार... कवी, गीतकार, प्रतिभावान लेखक, चित्रपट दिग्दर्शक अशी गुलजारांची आपल्याला ओळख आहेच. पण आता मराठी वाचकांसमोर गुलजार एक बाल साहित्यिक म्हणून येत आहेत.
बोस्कीची गोष्ट या मालिकेतील गुलजार यांनी लिहिलेली नऊ पुस्तके मराठी वाचकांच्या भेटीला येत आहेत. बच्चे कंपनींसाठी ही खरं तर गुलजार यांच्याकडून मोठी भेट ठरणार आहे. गुलजार आपली कन्या बोस्की हिच्या प्रत्येक वाढदिवशी तिला एक कथा लिहून भेट द्यायचे. याच कथा नंतर हिंदीत प्रकाशितही झाल्या. आता ग्रंथालीने गुलजारांच्या या कथा मराठीत बोस्कीच्या गोष्टी या नावाने मराठीत आणल्या आहेत.
गुलजार यांच्या या हिंदी पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला आहे उषा, मेहता, अमृता सुभाष, अंबरीश मिश्र यांच्यासारख्या दिग्गजांनी... तर या पुस्तकांना आकर्षक चित्रांनी सजवले आहे चित्रकार दिलीप वझे यांनी. गुलजार यांचे लेखन आणि वझे यांची बोलकी चित्रे यामुळे ही पुस्तके खूपच आकर्षक झाली आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.