www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
मुंबईसह ठाणे, नवी मुंबईमध्ये पावसाचा दणका बसल्यामुळे सकाळपासूनच उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. गाड्या ३० मिनिटे उशिराने धावत आहेत.
पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या मुख्य तसेच हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील गाड्या २० ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने नोकरदार वर्गाचे हाल झालेत. काहींनी बसचा पर्याय निवडला. मात्र, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने त्यांना विलंब सहन करावा लागला.
मुंबई-ठाण्यातील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे मुंबई-ठाण्यात प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईत वरळी, लोअर परेल, हिंदमाता, दादर, माटुंगा, सायन (शीव), किंग्ज सर्कल, कुर्ला, घाटकोपर, वांद्रे, माहिम, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी गोरेगाव आणि मालाड या परिसरात पाणी साचले आहे.
दरम्यान, कोकणातही पावसाचा जोर कायम आहे. कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसामुळे एक मालवाहक जहाज भरकटले आहे. या जहाजातील दहा जणांना वाचवण्यात आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी किमान ४८ तास मुसळधार पावसाची शक्यता आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.