www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सिंचन घोटाळ्यासंदर्भातील पुरावे देण्यासंदर्भात चितळे समितीनं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडेंना पत्र पाठवले आहे. दरम्यान, मी सर्व पुरावे देणार आहे, अशी माहिती तावडे यांनी झी मीडियाला दिली.
आमच्याकडे असलेले पुरावे समितीला सादर करण्याचे अधिकार नाही, असा आरोप विनोद तावडेंनी केला होता. त्यानंतर समितीनं तावडेंना पत्र पाठवलं आहे. बाहेरील व्यक्तीकडून पुरावे घेण्याचं समितीच्या कार्यकक्षेत उल्लेख नसल्याचा आरोप विनोद तावडेंनी केला होता.
सिंचन घोटाळ्याच्या एसआयटी चौकशीला सरकार तयार झाले. त्यानुसार जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापण करण्यात आली. याबाबतची घोषणा जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी केली होती. सिंचन चौकशीच्या घोषणेनंतर भाजपनं समाधान व्यक्त केलं होतं.
मात्र ज्या मंत्र्यांची एसआयटी चौकशी होणार त्यांची खाती काढून त्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून ठेवावे, अशी मागणी भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळं भाजपचा रोख सुनील तटकरे यांचे खाते काढून घेण्याकडे असल्याचं पुढं आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.