मुंबई : कल्याण–मुरबाड–नगर रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी लवकरच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासमेवत सर्व संबंधितांची बैठक घेणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी जाहीर केलं.
तसेच या प्रकल्पासाठी येणाऱ्या खर्चातील ५० टक्के वाटा राज्य सरकार उचलेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण-नगर रेल्वे मार्गाची मागणी होत होती. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे मुरबाडकरांमध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण झालाय.
तसंच मुबई-नागपूर समृद्धि महामार्गाला शहापूर तालुक्यातील शेतकरयांचा विरोध होतोय. मात्र, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प राबवणार असून, या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्य शासनाच्या महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित 3 दिवसीय शासकीय जत्रेची सांगता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली. यावेळी मुरबाडच्या प्रशासकिय कार्यालयाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.