मुंबई : कॉ. गोविंद पानसरे यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक भाकपने दिली आहे. पाच दिवस झाले तरी पोलिसांना हल्लेखोरांना पकडण्यात यश आलेले नाही.
पानसरे यांचे मारेकरी मोकाटच आहेत. पाच दिवसानंतरही तपास पथकांच्या हाती ठोस धागेदोरे आलेले नाहीत. तसेच राज्यभरात आंदोलन सुरु आहे. दीड वर्षांपूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. त्याला काल दीड वर्ष पूर्ण होत असतानाच पानसरेंचं निधन होणं हा एक दुर्देवी योगायोगच म्हणावा लागेल.
काँम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापुरात १६ फेब्रुवारी रोजी भ्याड हल्ला झाला होता. त्यांच्यावरही गोळीबार झाला होता. गेले ५ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांचं निधन झालं. एका पुरोगामी विचारवंताला महाराष्ट्र मुकला आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर अजून किती हल्ले होणार हाच खरा असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.
पानसरे यांच्या मृत्यूने महाराष्ट्राने कुशल संघटक, अनुभवसिद्ध लेखक, पुरोगामी विचारवंत आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढणारा आणखी एक कार्यकर्ता गमावला. मारेकऱ्यांनी झाडलेल्या गोळ्यांनी त्यांचा बळी घेतला. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. कुठे चाललाय माझा महाराष्ट्र असे म्हणण्याची वेळ आली आहे, असे भाकप महाराष्ट्र सचिव कॉ. भालचंद्र कांगो म्हणालेत.
महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देशातच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करून ठेवली आहे. हल्लेखोरांना पकडणे एवढे शासनाचे काम नसून त्यांचा पर्दाफाश करण्याची गरज आहे. तसेच, संपूर्ण महाराष्ट्र रविवारी बंद ठेवण्याचे मी आवाहन करतो, अशी प्रतिक्रिया कांगो यांनी दिली
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.