www.24taas.com, बीड
‘साहेब तुमचे स्वप्न पूर्ण होणार, टी-२० सामन्यामध्ये बॉम्बब्लास्ट होणार’ असा मॅसेज शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या खासगी सचिवांना - मिलिंद नार्वेकरांना - धाडणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी बीडमधून अटक केलीय.
सध्या भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यांचा आनंद प्रेक्षक लुटत आहेत. शिवसेनेनं या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांना जाहीरपणे विरोध केला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या एका चाहत्यानं आष्टी तालुक्यातील एका तरुणानं हा मोबाईल मॅसेज नार्वेकर यांना धाडला होता. मंगळवारी, बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान टी २० सीरिजमधली पहिली मॅच रंगली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहावी ओव्हर सुरू असताना यावेळी कडा गावात राहणाऱ्या अमित उर्फ अक्षय भंडारी या ‘बीएससी’मध्ये शिकत असलेल्या तरुणानं चिन्नास्वामी स्टेडियमवर बॉम्ब असल्याचा खोटा मॅसेज धाडला होता.
भंडारी हा शिवसेनेचा तसंच बाळासाहेबांचा चाहत्यांपैकी एक आहे. पण, आपण केलेली चूक लक्षात आल्यानंतर त्याला पोलिसांची भीती सतावू लागली. त्यामुळे त्यानं आणखी एक कहाणी रंगवली आणि त्यामुळे तो स्वत:च पोलिसांसमोर हजर झाला. पोलीस अधिक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारी त्याच रात्री पोलीस स्टेशनमध्ये आला आणि आपल्याला ४-५ व्यक्तींनी आपल्याला बंगलोर पोलिसांना फोन करण्यासाठी भाग पाडलं, अशी कहानी त्यानं रंगवली.
पोलिसांच्या अधिक चौकशीमध्ये सत्य बाहेर आलं. बंगलोर पोलिसांनीही आपल्याला असा धमकीचा फोन आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. त्यानंतर स्टेडियमच्या सुरक्षेत वाढ केली गेली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.