मुंबई : दिवसागणिक मुंबईत गर्दी वाढतच आहे. याचा परिणाम मुंबईतील लोकलवर पडत आहे. त्यामुळे गर्दीला लगाम घालण्यासाठी शाळा आणि सरकारी कार्यालयांच्या वेळेत बदल करण्याचा विचार राज्य सरकार करीत आहेत.
लोकलमधील गर्दी नियंत्रणासाठी प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणीचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन
लोकलमधील प्रचंड गर्दीवर तोडगा म्हणून कार्यालये आणि शाळा, महाविद्यालयांच्या वेळा अर्ध्या तासांच्या अंतराने बदलणे शक्य आहे. प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात दिली.
लोकल गर्दीवर तोडगा काढण्यासाठी साप्ताहिक सुट्टी दिवस आणि वेळा बदला, अशी सूचना न्यायालयाने आधीच्या सुनावणीवेळी सरकारला केली होती. हे बदल करणे शक्य आहे का, याबाबत उत्तर देण्यास न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार सरकारने तशी तयारी चालवली असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आलेय.
ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र जागा आरक्षित ठेवण्यासह रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी गर्दीवर तोडगा काढण्यासाठी न्यायालयाने केलेली सूचना अमलात आणणे शक्य असल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकील पद्मभूषण काकडे यांनी न्यायालयात दिली.
न्यायालयाने सरकारच्या या भूमिकेबाबत समाधान व्यक्त केले, मात्र त्याच वेळी राज्य सरकारने रेल्वे चालवण्याबाबतच्या सूचनेचाही विचार करण्याचे न्यायालयाने पुन्हा एकदा सुचवले.