www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
नोक-या आणि रोजगारामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याची भाषा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केली जाते. परंतु प्रत्यक्षात मनसेचे कार्यकर्तेच स्थानिकांच्या हातातला रोजगार हिरावून घेण्याचं काम करतायत...
मुलुंडच्या संत रामदास मार्गावर गेली २२ वर्ष पेपरविक्रीचा स्टॉल लावून आपला उदरनिर्वाह चालवणा-या ७२ वर्षीय अंबाबाई शेट्ये यांना सध्या मनसैनिकांचा जाच सहन करावा लागतोय... मनसे कार्यकर्त्यांनी आपल्या वडापावच्या गाड्या टाकण्यासाठी शेट्येबाईंना पेपरचा स्टॉल हटविण्यास सांगितलंय. इतकी वर्षे पेपरच्या स्टॉलवर आपलं आणि कुटुंबाचं पोट भरणा-या अंबाबाई यामुळं हतबल झाल्यात.
११ वर्षांपूर्वी मुलाचं निधन झाल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी वृद्ध अंबाबाईंवर पडली. त्यांच्या दोन मुलींपैकी लहान मुलगी मानसिक रुग्ण आहे. तिचा औषधोपचाराचा खर्च आणि संसाराचा गाडा चालवण्याची संपूर्ण जबाबदारी अंबाबाईवर आहे.
हा पेपरचा स्टॉल त्यांच्यासाठी आधार बनून राहिला आहे. परंतु त्याच जागेवर मनसे कार्यकर्त्यांची नजर पडलीय. त्यामुळं आपल्या कुटुंबाचा आधार कोलमडण्याची भीती त्यांना वाटतेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.