मोर्चासाठी मनसे सज्ज... पोलिसही दक्ष!

मनसेचे कार्यकर्ते हळूहळू गिरगाव चौपाटीवर जमायला सकाळपासूनच सुरुवात झालीय. तर दुसरीकडं मोर्चासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 21, 2012, 03:24 PM IST

www.24taas.com, मुंबई
गिरगाव चौपाटीवरच्या मोर्चासाठी मनसेनं जय्यत तयारी केलीये. मनसेचे कार्यकर्ते हळूहळू गिरगाव चौपाटीवर जमायला सकाळपासूनच सुरुवात झालीय. तर दुसरीकडं मोर्चासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केलाय. आंदोलकांची मोठी संख्या गृहित धरुन हा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं सांगण्यात येतय.
मनसे नेते आणि आमदार बाळा नांदगावकर यांच्याकडं गिरगाव चौपाटी मोर्चाची सूत्रं आहेत. मरीन -ड्राईव्ह- मत्सालयाच्या बाजूने इस्लाम जिमखान्याला डाव्या वळसा घालून वासूदेव बळवंत फडके चौक- बीएमसी ऑफिसमार्गे आझाद मैदान असा मोर्चाचा मार्ग आहे. पोलिसांची परवानगी नसली तरी मोर्चा निघणारच असा निर्धार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलाय. मोर्चासाठी पोलिसांनी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलयं.
दरम्यान, मनसेच्या मोर्चासाठी मुंबईत प्रवेश करणाऱ्या गाड्यांची ठाण्यात कसून चौकशी करण्यात येतेय. या मोर्चासाठी राज्यभरातून मनसे कार्यकर्ते मुंबईत दाखल होतायत. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलाय. जवळपास १० हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. मुंबई पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव दलाच्या तुकड्या आणि रॅपिड एक्शन फोर्स तैनात करण्यात आलयं. गिरगाव चौपाटीला पोलीस छावणीचं स्वरुप प्राप्त झालयं. मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडक उपाययोजना करत मुंबईत जाणाऱ्या प्रत्येकाची झडती सुरू केलीय. पण यामुळं मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.