मुंबई : हल्ली लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच हातात मोबाईल दिसतो... तो ही स्मार्ट फोन... स्मार्ट फोन्सनी सगळ्यांनाच वेड लावलंय. पण, हेच स्मार्ट फोन्स शाळांसाठी मात्र डोकेदुखी ठरतायत.
हल्ली विद्यार्थ्यांच्या दप्तरात पुस्तकं, वह्या, कंपास, पट्टी, रबर या सगळ्याबरोबर आता स्मार्टफोनही आलाय. वर्गात तास सुरु असला तरी फेसबुक आणि व्हॉटसऍपवर ऑनलाईन असणं, गेम खेळणं, फोटो काढणं हे सर्रास चालतं. मधल्या सुट्टीत मैदानातल्या लंगडी, कबड्डीची जागा अँग्री बर्ड, आयजीआय टू या गेम्सनी घेतलीय. त्याच्याही पुढे जात वर्गातल्या मैञीणींचे फोटो काढणं, नको, नको ते व्हीडिओ पाहणं, हे सगळं बिनधास्त सुरू असतं.
नियमाप्रमाणे शाळेत मोबाईल घेवून जायला मनाई आहे. जर विद्यार्थ्याकडे मोबाईल सापडला तर तो ताब्यात घेवून शाळा पालकांना बोलावते. पण पालकच मुलांना पाठीशी घालतात. महत्त्वाचं म्हणजे शिक्षकांचाच एखादा व्हिडिओ विद्यार्थी काढतील की काय, याचीही भीती शिक्षकांना वाटतेय.
या सगळ्यात पालकांचीही बाजू आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं आमच्या मुलांकडे मोबाईल हवाच, असं त्यांचं म्हणणं आहे.
पालकांची त्यांच्या मुलांबद्दलची काळजी, मुलांचा मोबाईल शाळेत नेल्यावर व्रात्यपणा आणि त्यामुळे शिक्षकांच्या डोक्याला होणारा ताप... या सगळ्यामधून सोल्युशन काढायला हवं. त्यासाठी शाळेत विद्यार्थ्यांच्या मोबाईलसाठी लॉकर्स करता येतील, पालकांनी विद्यार्थ्यांना स्मार्टफोनऐवजी बेसिक फोन देण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. पण, सध्या मुलं व्हॉटसऍप आणि फेसबुकवर अपडेट असतात, याचं पालकांनाच अप्रूप असतं. आधुनिक आणि अपडेट प्रत्येकालाच व्हायचंय. पण त्या सगळ्यामध्ये बालपण हरवून जात असेल तर त्याची काळजी पालक आणि शिक्षकांनी घ्यायलाच हवी.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.