'मुलांसारखे ड्रेस घातले तर मुलींची प्रजननक्षमताच संपूण जाईल'

वांद्र्यामधल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नवा कॅम्पस ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे. अर्थातच ही सगळी बंधनं फक्त मुलींवरच आहेत.... आणि हे ड्रेसकोड लागू करण्याचं कॉलेजचा तर्कही अत्यंत धक्कादायक आहे.

Updated: Feb 9, 2017, 10:14 AM IST
'मुलांसारखे ड्रेस घातले तर मुलींची प्रजननक्षमताच संपूण जाईल' title=

मुंबई : वांद्र्यामधल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये नवा कॅम्पस ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे. अर्थातच ही सगळी बंधनं फक्त मुलींवरच आहेत.... आणि हे ड्रेसकोड लागू करण्याचं कॉलेजचा तर्कही अत्यंत धक्कादायक आहे.

- मुलींनी मुलांसारखे कपडे घातले तर त्यांच्यातली प्रजननक्षमताच संपून जाईल

- पँट-शर्ट घातल्यावर मुली मुलांसारख्याच विचार करायला लागतात

- कॉलेज कॅन्टीनमध्ये मुलं-मुलींसाठी वेगळी जागा केली तर छेडछाड थांबेल

हे सगळे धक्कादायक साक्षात्कार झालेत वांद्र्यातल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्य मॅडमना.... मुलींशी होणारी छेडछाड थांबवण्यासाठी कॉलेज कॅन्टीनमध्ये मुलामुलींच्या बसण्याच्या जागा वेगवेगळ्या करण्यात आल्यात. दोघांमध्ये एक लक्ष्मणरेषा आखून देण्यात आलीय.

कॅन्टीनध्ये ही लक्ष्मणरेषा आखून झाल्यावर प्राचार्यांनी आणखी धक्कादायक प्रस्ताव समोर आणलाय. मुलींनी मुलांसारखी शर्ट पॅन्ट घातली तर त्या मुलांसारखाच विचार करायला लागतात आणि कालांतरानं त्यांच्यातली प्रजननक्षमता संपुष्टात येते, मुलींना PCOS सारखा आजार होतो, असे चक्रावणारे निष्कर्ष या मॅडमनी काढलेत. त्यामुळे मुलींनी यापुढे कॉलेजमध्ये पंजाबी ड्रेस किंवा सलवार-कमीजच घातली पाहिजे, असा नियम लागू करण्यात येणार आहे. याचं पालन केलं नाही तर दंडही आकारला जाणार आहे. 

कॅन्टीमधून मुलं-मुलींना वेगळं केल्यानं छेडछाड थांबणार आहे का, याचं उत्तर कॉलेजकडे नाही. पॅण्ट शर्ट घातल्यावर मुलींमधली प्रजननक्षमता संपते, हे कुठल्या डॉक्टरनं सांगितलं, याचं उत्तरही नाही. मुलांनी मुलींकडे पाहू नये, यासाठी मुलींनी ड्रेस कोड का बदलायचा ? मुलींनी पंजाबी ड्रेस घातल्यावर मुलं त्यांच्याकडे पाहणं बंद करणार आहेत का ? ज्या मुलांनी छेडछाड केली, त्या मुलांवर कारवाई केली का, याचं उत्तरही कॉलेज प्रशासनाकडे नाही. सगळी बंधनं मुलींवर...

आणि सगळ्यात मोठं दुर्दैव हे की इतके मागासलेले आणि बुरसटलेले विचार असणा-या प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या सहवासात पुढची पिढी घडतेय.