मुंबई : पवईतील चांदिवलीतील लेक होम या उच्चभ्रू सोसायटीत लागलेल्या आगीत धुराने गुदमरून ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सध्या अग्निशामक दलाला आग विझविण्यात यश मिळाले आहे.
आग लागल्यानंतर काही जण लिफ्टच्या माध्यमातून इमारतीच्या खाली येत असताना लिफ्ट आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. त्यात सात जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे ज्या घरात आग लागली त्या घरातील ५ जणांना अग्निशामक दलाने सुरक्षित बाहेर काढले.
मृतांमध्ये पाच पुरूष, दोन महिलांचा समावेश आहे. या आगीत एकूण २२ जण जखमी झाले असून त्यातील एका व्यक्तीला ऐरोलीतील नॅशनल बर्न सेंटरमध्ये हलविण्यात आले आहेत.
पवई येथील चांदिवली लेक होम सोसायटी, फेज ३, पवई फार्म मार्ग, गोपाळ शर्मा शाळेजवळ या २१ मजल्यांच्या इमारतीतील १४ व्या आणि १५ व्या मजल्याला आज (दिनांक ६ जून, २०१५) सायंकाळी सुमारे ६.१४ वाजेच्या सुमारास आग लागली.
मुंबई अग्निशमन दलाची १५ वाहने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. जखमींमध्ये १० पुरूष आणि ११ महिला जखमींवर हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.