www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई गँगरेप प्रकरणाच्या सुनावणीत मंगळवारी पहिल्यांदाच ‘त्या’ पत्रकार तरुणीच्या आईनं आपला आकांत व्यक्त केलाय. ‘माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच माझ्या मुलीचा फोन आला आणि आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं’ असं तरुणीच्या आईनं यावेळी सांगितलंय.
जवळजवळ दोन तास मुंबई गँगरेप प्रकरणातील पीडित पत्रकार तरुणीच्या आईची जबानी सुरू होती. भर कोर्टात तिची आई आपल्या मुलीवर आणि संपुर्ण कुटुंबावर ओढावलेला प्रसंग आणि आपल्या भावना व्यक्त करत होती. तीची ती कहाणी ऐकताना कोर्टात उपस्थित असलेला प्रत्येक जण सुन्न झाला होता. ती संपूर्ण वेळ धाय मोकलून रडत होती पण तिला थोपवण्याचं, समजावण्याचं धैर्य कुणातच नव्हतं.
‘त्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि रात्री आम्ही तो सगळेजण मिळून साजरा करणार होतो. परंतु ‘मॉम, आय ऍम फिनिश्ड’ असं सांगणाऱ्या मुलीचा आवाज फोनवर ऐकला आणि सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली… आमचे कुटुंब पार उद्ध्वस्त झाले’ असं त्या आईनं म्हटलंय. न्यायाधीश शालिनी फणसाळकर-जोशी यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा सुरू आहे.
दोन महिन्यांपूर्वी महालक्ष्मी इथल्या शक्ती मिलमध्ये पत्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. सगळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी सुरू आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.