www.24taas.com, मुंबई
सिने दिग्दर्शक यश चोप्रा यांच्यासह गेल्या वर्षभरात ५० जणांचा बळी घेणाऱ्या डेंग्यु आणि मलेरियाच्या मच्छरांची मुंबईकरांवर दहशत आहे. या डासांचा नायनाट करण्याच्या नावाखाली मुंबई महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करत असली तरी प्रत्यक्षात मनपाची यंत्रणा मुंबईकरांच्या डोळ्यात कशी धूळफेक करत आहे याचं वास्तव झी २४ तासनं पुढं आणलंय....
मुंबईत गेल्या वर्षभरात मलेरिया आणि डेंग्युनं तब्बल 50 जणांचा बळी घेतलाय. मुंबईकरांचा बळी घेणाऱ्या मलेरिया आणि डेंग्युच्या मच्छरांना मारण्यासाठी महापालिकेनं तब्बल अडीच कोटींचा खर्च केलाय. त्यातून ठिकठिकाणी होणारी फवारणी मुंबईकरांना दिसते खरी, पण प्रत्यक्षात ती मुंबईकरांच्या डोळ्यांत धूरफेकच ठरत असल्याचं झी 24 तासनं समोर आणलंय. कारण हे मच्छर मारण्यासाठी लागणारं एमएलओ ऑईल 2 कोटी 44 लाख रुपये खर्चून खरेदी केल्याचा दावा महापालिका करत असली तरी प्रत्यक्ष गोडाऊनमध्ये या ऑईलचा साठाच दिसत नाही. कुर्ला बैलबाजारातल्या या गोदामात 1 हजार 800 लिटर एमएलओ ऑईल असल्याचं महापालिकेच्या रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलंय. पण झी 24 तासनं तिथं जाऊन पाहणी केली तेव्हा प्रत्यक्षात तिथं रिकामे गॅलन दिसत होते. महापालिकेनं विकत घेतलेलं एमलओ ऑईल, बीटॅक्स, पायरोसीन, नुवान, टिग्वॉन, ग्रॅनवेल, एबेट असा औषधाचा साठा या गोदामात कुठेच दिसत नसल्याचं झी 24 तासच्या कॅमे-यात कैद झालंय. आम्ही ही वस्तुस्थिती मनपा अधिकारी आणि सत्ताधारी शिवसेना नेत्यांच्या कानावर घातली, पण ती मानायला मनपातले नेते आणि अधिकारी तयार नव्हते.
महापालिका अधिकारी आणि स्थायी समिती अध्यक्षांचा प्रत्यक्ष कॅमेऱ्यात कैद झालेल्या या वस्तुस्थितीवर विश्वास नसला तरी केवळ धूर फवारून मच्छर मारण्याचा महापालिकेचा दिखावा झी 24 तासनं समोर आणलाय. महापालिकेचे कर्मचारी फवारणी करून गेले तरी मच्छर मरणं तर दूरच मच्छरच्या अळ्यांवरही काहीच परिणाम होत नसल्याचं दिसून आलं. कारण मलेरियाचे मच्छर आणि अळ्या मारण्यासाठी आवश्यक असलेले एमएलओ ऑईल वापरलेच नाही तर मच्छरांवर परिणाम होणार तरी कसा? महापालिकेचे अधिकारी कोट्यवधी रुपयाचे एमएलओ ऑईल फवारणीसाठी वापरत असल्याचं दाखवत असले तरी प्रत्यक्षात या ऑईलऐवजी प्रत्यक्षात रॉकेल आणि गॅरेजमधलं जळकं ऑईलचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहितीच झी 24 तासला मिळाली.
मलेरियाचे एनफोलिस आणि डेंग्युचे एडिस नावाचे मच्छर मुंबईकरांचा बळी घेण्यासाठी डंख मारत असले तरी त्यांना मारण्याच्या नावाखाली मुंबई महापालिकेला तेल लावणाऱ्या यंत्रणेतल्या मच्छरांचंच त्यांना अभय असल्याचं स्पष्ट दिसतंय.