www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळं महाराष्ट्राचं मोठं नुकसान तर झालंय, पण मराठवाडा पोरका झालाय... आधी प्रमोद महाजन, मग विलासराव देशमुख आणि आता गोपीनाथ मुंडे... एकमेकांचे चांगले मित्र असलेल्या मराठवाड्याच्या या तिन्ही सुपुत्रांनी अचानक एक्झिट घेतल्यानं, हळहळ व्यक्त केली जातेय...
प्रमोद महाजन... विलासराव देशमुख... आणि गोपीनाथ मुंडे... एकमेकांचे जीवाभावाचे मित्र... तिघांचं हे दिलखुलास हंसणं आता कधीच दिसणार नाही... मराठवाड्यासारख्या ग्रामीण भागातून उदयाला आलेले महाराष्ट्राचे हे नेते... महाजन आणि मुंडे भाजपच्या मुशीत घडलेले, तर विलासराव देशमुखांनी काँग्रेसची वाट धरलेली... पण राजकीय पक्षभेद या तिघांच्या मैत्रीमध्ये कधीही आड आले नाहीत... महाराष्ट्र गाजवल्यानंतर तिघांनीही दिल्लीपर्यंत धडक मारली.. पण तिघांचाही राजकीय प्रवास आकस्मिकपणे संपला...
प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री फुलली ती आणिबाणीच्या काळात... अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत असताना आणीबाणीविरोधी आंदोलनात ते ओढले गेले. दोघांनाही तुरूंगवास भोगावा लागला... कालांतरानं या मैत्रीचं रूपांतर कौटुंबिक नात्यात झालं... प्रमोद महाजनांची सख्खी बहिण प्रज्ञा यांच्याशी मुंडेंचा विवाह झाला... त्यानंतर महाजन-मुंडे ही महाराष्ट्राच्या राजकारणातली जोडगोळीच बनली. महाजनांनी दिल्ली आणि मुंडेंनी महाराष्ट्र सांभाळावा, अशी ही रचना होती. 1990 मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली, तेव्हा भाजपच्या वतीनं महाजन हे युतीचे शिल्पकार ठरले. तर तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवारांच्या विरोधात संघर्ष यात्रेच्या माध्यमातून मुंडेंनी रान पेटवलं. 1995 मध्ये युतीचे सरकार सत्तेवर आलं, तेव्हा मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले... दिल्लीमध्ये तत्कालिन वाजपेयींच्या सरकारमध्ये प्रमोद महाजन हे त्यांचे 'लक्ष्मण' बनले होते. कालांतराने सत्ता गेली, पण भाजपमध्ये प्रमोद महाजनांनी मोठी उंची गाठली... पक्षाचं तरूण नेतृत्व म्हणून महाजनांचं नाव उदयास आलं. मात्र 2006 मध्ये कौटुंबिक कलहातून प्रमोद महाजनांचे सख्खे बंधू प्रवीण महाजन यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. 3 मे 2006 रोजी प्रमोद महाजनांचं हिंदूजा रूग्णालयात निधन झालं. महाजनांचा मृत्यू हा गोपीनाथ मुंडेसाठी फार मोठा धक्का होता.
दुसरीकडे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांचीही मैत्रीही महाराष्ट्राच्या राजकारणात गाजली. विलासराव काँग्रेसमध्ये आणि मुंडे भाजपमध्ये होते, पण मैत्रीत कधी पक्षभेद आड आले नाहीत. निवडणुकीचं मैदान असो, नाहीतर विधानसभेचा आखाडा, एकमेकांना चिमटे काढण्याची, कोपरखळ्या मारण्याची आणि राजकीय कुरघोडी करण्याची एकही संधी दोघांनी कधी सोडली नाही. विलासराव-मुंडेंची मैत्री राजकारणाच्या पलीकडची होती. विलासराव दिल्लीमध्ये मंत्री झाले, तर मुंडेही बीडचे खासदार म्हणून दिल्लीला पोहोचले... मात्र दुर्दैवानं 14 ऑगस्ट 2012 रोजी केंद्रीय मंत्री असतानाच, यकृत आणि मूत्रपिंड निकामी झाल्यानं विलासरावांचा मृत्यू झाला. मुंडेंचा आणखी एक मित्र त्यांना कायमचा सोडून गेला...
पण नियतीचा खेळ पाहा... केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर, विलासरावांप्रमाणेच गोपीनाथ मुंडेही ग्रामविकास खात्याचे मंत्री झाले... शपथविधीला आठवडा उलटत नाही, तोच मुंडेंचं दिल्लीमध्ये अपघाती निधन झालं.... दिल्ली काबीज करायला गेलेल्या तिघा मराठवाड्यातील मित्रांचा प्रवास अचानक थांबला... महाजन, देशमुख आणि मुंडे... तिघांचीही एक्झिट धक्कादायक होती... चटका लावणारी होती...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.