www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मुंबई क्राईम ब्रॅँचकडून स्वतंत्रपणे तपास करण्यात येणार आहे. त्यासाठी क्राईम ब्रँचची एक टीमही पुण्यात दाखल झालीय. मुंबई क्राईम ब्रँचला दाभोलकरांच्या मारेक-याबद्दल काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेत. त्यानुसार हा तपास करण्यात येणार आहे. तर कुटुंबीयांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलीय. ज्या कडव्या हिंदूत्ववाद्यांचा त्यांनी आयुष्यभर विरोध केला त्यांनीच दाभोलकरांची हत्या केल्याचा संशय त्यांचे पुतणे डॉक्टर प्रसन्न दाभोलकर यांनी व्यक्त केलाय. तपासाबाबत कुठलीही अपेक्षा नसल्याचं सांगत त्यांनी सरकारवर अविश्वासच व्यक्त केलाय.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला २४ तास उलटून गेलेत. तरीही अजून मारेकरी मोकाटच आहेत. मारेकर-यांचं रेखाचित्र पोलिसांची जारी केलं आहे. तरीही मारेकरी अजूनही मोकाटच आहेत. २४ तासांनंतर आज पुणे बंद पाळला जाणार आहे. राज्यातही अनेक ठिकाणी निषेध सभा, मोर्चे होतील. पण आता तातडीने मारेकरी ताब्यात य़ेणं आणि या निंदनीय कृत्यामागे कोण आहे त्याचा शोध होणं गरजेचं आहे.
दाभोलकरांच्या मारेक-यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. मारेक-याचं स्केच पुणे पोलिसांनी जारी केलंय. हल्लेखोरांच्या तपासासाठी ८ टीम तयार करण्यात आल्याचं पुण्याचे सहपोलीस आयुक्त संजीवकुमार सिंघल यांनी स्पष्ट केलंय. या हल्ल्याचे कोणतेही धागेदोरे अद्याप हाती आलेले नाहीत. सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरू असल्याचंही सिंघल म्हणाले. डॉ. दाभोलकर यांना ३ गोळ्या लागल्या असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवलीये. दरम्यान, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. तसंच सरकारचा धाक, दराराही राहिला नसल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलीय. ते नागपुरात बोलत होते.
दाभोलकर यांच्यावर काल साता-यामध्ये शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा हमीद आणि मुलगी मुक्ता यांनी संयुक्तपणे त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत दाभोलकरांना अखेरचा निरोप देण्यात आला. सातारा हे डॉ. दाभोलकरांचं जन्मगाव.
सातारा हेच त्यांच्या अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचं मुख्य आधारकेंद्र राहिलंय. या शहरानं त्यांच्या चळवळीला नेहमीच साथ दिली. डॉ. दाभोलकरांच्या हत्येमुळे शहरावर शोककळा पसरलीये. समाजसुधारणेची मशाल महाराष्ट्रभर पेटवणा-या आपल्या लाडक्या सुपुत्राला शेवटचा निरोप देण्यासाठी साताराकरांनी मोठी गर्दी केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ