मुंबई : रेल्वे रुळावर गेलेला चेंडू आणण्यासाठी गेलेल्या मुंबईतल्या लहानग्या साहिल अरविंद जाधव याला मालगाडीनं उडवलं. यात जबर जखमी झालेल्या साहिल जाधवची, राजावाडी रुग्णालयात दोन दिवसांपासून मृत्यूशी झुंज सुरु आहे.
घाटकोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ अरविंद जाधव खेळत होता. रेल्वे रुळावर गेलेला चेंडू आणण्यासाठी रेल्वेच्या तुटलेल्या संरक्षक भिंतींमधून तो रुळावर गेला होता. घाटकोपर पूर्व लोहमार्गाच्या बाजूलाच गौरीशंकर वाडी वसली आहे. लोहमार्ग आणि गौरीशंकर वाडी यांच्या मधून जवाहर रस्ता जातो. येथेच खेळणाऱ्या हा लहानगा बॉल आणण्यासाठी गेला असता हा अपघात झाला.
जवाहर या रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी स्थानिक अनेक वर्षांपासून करत आहेत. या जवाहर रस्त्याला लागूनच रेल्वे प्रशासनानं संरक्षित भींत उभारली आहे. मात्र अनेक ठिकाणी ही संरक्षक भिंत तुटली आहे. तर अनेक ठिकाणी नालेसफाईकरता रेल्वेने भींत तोडली गेल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. त्यामुळे साहिलच्या अपघातासाठी स्थानिकांनी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरलं आहे. तर रेल्वेकडून याप्रकरणी कोणताही खुलासा अजूनपर्यंत आलेला नाही.