www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे राज यांना आपले आंदोलन करता येणार नाही. उद्याच्या रास्तारोकोच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस बजावली. प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत ही नोटीस पाठविण्यात आली आहे. आता राज यांच्या आंदोलनाला परवानगीच नाकारण्यात आलेय. जमाव बंदीचा आदेशही लागू करण्यात आलाय.
दरम्यान, रास्ता रोकोसाठी आज ठरणार मनसेची रणनिती ठरणार आहे. १२ फेब्रुवारीला म्हणजेच उद्या मनसे टोलविरोधात रास्तारोको करणारेय. या रास्तारोकोचं नेतृत्व स्वत: राज ठाकरे करणारेत. त्याच पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांनी सर्व पदाधिका-यांची बैठक बोलवलीय. ही बैठक माहिमच्या मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात होणार असून बैठकीत उद्या होणा-या रास्तारोकोची रणनीती ठरवणार आहेत. या बैठकीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणारेत.
राज ठाकरेंना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावलीय. कलम १४९ च्या अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईची ही नोटीस बजावण्यात आलीय. १२ तारखेला राज ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये मुंबईत निघणा-या मोर्च्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राज ठाकरेंची असेल असं या नोटीशीत बजावण्यात आलंय. तसेच पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही. त्यामुळे या आंदोलनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला आव्हान दिल्यानंतर, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी कारवाईचे संकेत दिलेत. हिंमत असेल तर सरकारने मला अडवून दाखवावं, अटक करून दाखवावं, असं आव्हान राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत बोलताना दिलं. त्यावर कुणी कायदा हातात घेतला तर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिलाय. तसंच टोलनाक्यांची तोडफोड केल्यास दोषींना अटक करून, नुकसान भरून काढणार असल्याचंही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.