मुंबई : लोकलसाठी रेल्वेने रिटर्न तिकिटासाठी दिलेली परतीची वेळ सुविधा कमी करण्याचे संकेत मिळत आहेत. याबाबत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाची सूचना रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आलेय. त्यामुळे आता रिटर्न तिकिट सहातासांसाठीच असेल.
दरम्यान, मध्य रेल्वेच्या या निर्णयाला प्रवासी संघटनेन तीव्र विरोध केलाय. उपनगरीय प्रवासादरम्यान परतीच्या प्रवासासाठी अत्यंत सोयीचे रिटर्न तिकीट केवळ सहा तासांसाठीच वैध ठेवण्यात यावे, अशी सूचना मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे बोर्डाकडे पाठवली आहे.
सध्या रिटर्न तिकीट दुसऱ्या दिवशीही परतीचा प्रवास करण्यासाठी वैध मानले जाते. याचा दुरुपयोग करून रेल्वेला फसविण्यात येत असल्याचा दावा करत ही सूचना पाठवण्यात आली आहे. रेल्वेचा महसूल वाढवण्यासाठी काय काय गोष्टी करता येतील, याबाबतच्या सूचना रेल्वे बोर्डाने सर्वच विभागांकडून मागवल्या होत्या. त्यात रिटर्न तिकिटाच्या नियमांत बदल करण्याबाबतही सूचना कराव्यात, असे रेल्वे बोर्डाने सुचवले होते.
उपनगरीय प्रवासासाठी रिटर्न तिकिटांची मर्यादा एका दिवसाची म्हणजेच रात्री १२ ते दुसऱ्या रात्री १२ पर्यंतच ठेवावी, असे काही विभागांनी सुचवले होते. मात्र मध्य रेल्वेने त्यापुढे जात रिटर्न तिकीट केवळ सहाच तासांसाठी वैध धरले जावे, अशी सूचना मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उपनगरीय प्रवास जास्तीत जास्त दोन ते अडीच तासांचा असतो. त्यामुळे सहा तासांची वैधता योग्य आहे. त्यानंतर प्रवाशांना त्या ठिकाणाहून आपल्या ठिकाणापर्यंत तिकीट काढता येईल, असे रेल्वेचे म्हणणे आहे.