मुंबई : 'सामना'च्या अग्रलेखातून आज फडणवीस सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडण्यात आलंय. भंडारा आणि गोंदिया जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या पदरी दारूण अपयश आलंय. या निकालावरून विदर्भातल्या जनतेमधली खदखद स्पष्ट होत असल्याचं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय.
विदर्भाचा संपूर्ण कौल लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्यावेळी युतीच्या बाजूनं होता. खासकरून विधानसभेत तर भाजपनं अख्खा विदर्भ व्यापून टाकला होता. मग सहा महिन्यात असं काय झालं की, भाजपला असा पराभव स्वीकारावा लागला, असा खोचक सवालही 'सामना'मधून विचारण्यात आलाय.
काय म्हटलंय अग्रलेखात...
१५ जूनपर्यंत शेतकर्यांच्या नुकसानीचा पंचनामा वगैरे होऊन त्यांच्या आधीच्या कर्जाचे पुनर्गठन होऊन त्यांना कर्ज मिळेल असा मुख्यमंत्र्यांचा शब्द होता, पण मदत नाही, कर्ज नाही व चूलही पेटत नाही. अशा कोंडीत सापडलेल्या हजारभर शेतकर्यांनी वर्षभरात आत्महत्या केल्या असतील तर संपूर्ण विदर्भाचा ‘भंडारा-गोंदिया’ व्हायला वेळ लागणार नाही. विदर्भातील खदखद भंडारा तसेच गोंदिया जिल्हा परिषदेच्या निकालातून बाहेर पडली हे सत्य स्वीकारले तर येणारा काळ कठीण आहे असे भाकीत आम्ही आजच करीत आहोत.
सध्या सहकुटुंब अमेरिकेच्या दौर्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कानी दोन बातम्या गेल्या असतील. विदर्भात गेल्या ४८ तासांत १० शेतकर्यांनी आत्महत्या केल्या ही पहिली बातमी आणि भंडारा तसेच गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची साफ धूळधाण उडाली असून तेथे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसला एकहाती सत्ता मिळाली आहे. विदर्भाचा संपूर्ण कौल लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या बाजूने होता.
खासकरून विधानसभा निवडणुकीत विदर्भ भाजपच्या बाजूने उभा राहिला व विदर्भामुळेच भाजपचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या गादीवर बसला, पण त्याच विदर्भातील पहिल्या महत्त्वाच्या निवडणुकीने भाजपास धक्का दिला आहे. ही दुसरी बातमीही एव्हाना न्यूयॉर्कला पोहोचली असेल. भंडारा आणि गोंदियातील जनतेने राष्ट्रवादी व कॉंग्रेसला स्वीकारले, याचा कोणी काय घ्यायचा तो अर्थ घेऊ द्या, पण महाराष्ट्रासाठी हे लक्षण बरे नव्हे व हा शुभशकून नव्हे ही आमची खंत आहे.
आजच्या राजवटीपेक्षा आधीचे लोक बरे होते या वैफल्यातून या दोन्ही ठिकाणचा निकाल लागला असेल तर महाराष्ट्राचे समाजमन ओळखून सरकारला पावले उचलावी लागतील. भंडारा तसेच गोंदियात पैशांचा पाऊस पाडला म्हणून कॉंग्रेस-राष्ट्रवादीने यश मिळवले ही सारवासारव आता करता येणार नाही. जो सत्तेवर असतो तोच पैशांचा पाऊस पाडून निवडणुका जिंकू शकतो व असा पाऊस भंडारा आणि गोंदियात कोणी पाडत होते असे जर म्हटले तर मग महाराष्ट्राचा निवडणूक आयोग व पोलीस खाते काय करीत होते, हा प्रश्न निर्माण होतो.
दुसरे असे की, याच भंडारा तसेच गोंदियात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत पैशांचा पाऊस पाडूनही राष्ट्रवादीचे श्रीमंत व तालेवार उमेदवार पडले होते. त्यामुळे फक्त पैशानेच सर्वकाही सदासर्वकाळ जिंकता येते हे सत्य नाही. भंडारा-गोंदियाचा निकाल हा निदान विदर्भाची जनभावना समजायला हवी. कारण विदर्भाचे मुख्यमंत्री, महत्त्वाच्या खात्याचे मंत्री राज्यकारभारात असूनही विदर्भात आनंदाचे क्षण येऊ शकले नाहीत व गेल्या सहा महिन्यांत शंभरावर शेतकर्यांनी आत्महत्या करून सरकारला अस्वस्थ केले आहे. त्यात मुख्यमंत्री अमेरिकेत असताना १० शेतकर्यांनी जीवनाचा अंत करून घ्यावा हे भयंकर आहे.
व्यापमं घोटाळ्यावल भाष्य..
बाजूच्या मध्य प्रदेशात व्यापम घोटाळा वेगळ्याच कारणाने गाजतो आहे. या घोटाळ्याशी संबंधित संशयित लोक, पोलीस व पत्रकार मिळून आतापर्यंत तिसेक लोकांचे रहस्यमय मृत्यू झाले व रहस्य शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण विदर्भातील शेकडो शेतकर्यांनी केलेल्या आत्महत्या हे रहस्य नसून सरकार असहाय्य शेतकर्यांना आधार देण्यास कमी पडत असल्यानेच शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्या करीत आहे. कर्जाचे ओझे आहे. नापिकी व दुबार पेरणीचे संकट आहे. सरकारने घोषित केलेली मदत शेतकर्यांच्या खात्यात जमा होत नाही. जगायचे कसे? या विवंचनेत असलेला शेतकरी शेवटी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो.
आत्महत्येमागची कारणे शोधायची आता गरज नाही. पांडुरंग डोमाजी मडावी (जिल्हा यवतमाळ, बाभूळगाव) यांच्याकडे तीन एकर शेती होती. दोन वर्षांपासून त्यांचे कर्ज थकले होते. पांढरकवडा तालुक्यातील शिरसगाव येथील अमोल तुकाराम येवले व टाकळी येथील महिला शेतकरी गंगूबाई मडावी यांनी पीककर्ज न मिळाल्याने आत्महत्या केली. अमरावतीमधील तीन शेतकर्यांनी नापिकीला कंटाळून जीवन संपवले आहे व या सगळ्यांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.
१५ जूनपर्यंत शेतकर्यांच्या नुकसानीचा पंचनामा वगैरे होऊन त्यांच्या आधीच्या कर्जाचे पुनर्गठन होऊन त्यांना कर्ज मिळेल असा मुख्यमंत्र्यांचा शब्द होता, पण मदत नाही, कर्ज नाही व चूलही पेटत नाही. अशा कोंडीत सापडलेल्या हजारभर शेतकर्यांनी वर्षभरात आत्महत्या केल्या असतील तर संपूर्ण विदर्भाचा ‘भंडारा-गोंदिया’ व्हायला वेळ लागणार नाही. विदर्भातील खदखद भंडारा तसेच गोंदिया जिल्हा परिषदेच्या निकालातून बाहेर पडली हे सत्य स्वीकारले तर येणारा काळ कठीण आहे असे भाकीत आम्ही आजच करीत आहोत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.