मुंबई: विधानसभा निव़डणुकीत सपाटून मार खाल्लेला मनसेला मोठं खिंडार पडलंय. वसंत गीते, प्रवीण दरेकर आणि रमेश पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या मुंबईत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्यातील मनसे नेते आणि कार्यकर्ते पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याचं बोललं जातंय.
विधानसभा निवडणुकीत मनसेच्या निराशाजनक कामगिरीनंतर प्रवीण दरेकर आणि वसंत गीते या दोघांनीही मनसेच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला होता. दरेकर आणि गीते हे दोघंही पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा होती.
मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी या दोघांचाही राजीनामा स्वीकारत सर्वांनाच धक्का दिला होता. हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून भाजपाच्या संपर्कात असल्याचे समोर आलं होतं. अखेरीस आज प्रवीण दरेकर आणि वसंत गीते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं.
प्रवीण दरेकर आणि वसंत गीते यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्यानं मनसेसाठी हा मोठा हादरा समजला जात आहे. हे दोघंही मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंसोबत होते. पण विधानसभा निवडणुकीतील पराभवानं राज ठाकरेंचे निकटवर्तीयही त्यांच्यापासून दुरावल्याचं दिसतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.