मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ यांना अटक केल्यानंतर, आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. "महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचा वापर यापद्धतीने, यापूर्वी करण्याची पद्धत मी कधी पाहिलेली नव्हती" असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.
बाळासाहेब, मुंडेंच्या काळात असं कधी झालं नाही- पवार
तसेच यावेळी शरद पवारांनी युती शासनाचीही आठवण करून दिली. आम्ही यापूर्वीही विरोधक होतो, बाळासाहेबांच्या काळातही अशा पद्धतीने एखाद्याला टार्गेट करण्याची आणि सत्तेचा वापर करण्याची पद्धत आपण पाहिली नाही.
मनोहर जोशी, नारायण राणे शिवसेनेचे मुख्यमंत्री असतानाही सत्तेचा असा वापर झाला नाही, असंही यावेळी शरद पवारांनी आवर्जुन सांगितलं.
यांना पुढचे अधिकारप्राप्त झाले आहेत की काय? - पवार
आजारपणानंतर शरद पवारांनी घेतलेली ही पहिलीच पत्रकार परिषद होती. "एखादा सत्ताधारी खासदाराकडून जेलमध्ये टाकण्याची भाषा होते, आणि दुसऱ्या दिवशी जेलमध्ये टाकण्यात येतं, यावरून त्यांना पुढचे अधिकारप्राप्त झाले आहेत की काय?, यावरून चौकशी करणाऱ्या एजन्सीजवर दबावतंत्राचा वापर होत असल्याचं दिसून येत आहे", असं शरद पवरांनी म्हटलं आहे.
एकाच व्यक्तीच्या संस्था आणि घरांवर तीन वेळेस धाडी का?
एकाच व्यक्तीच्या संस्था आणि घरांवर तीन वेळेस धाडी का?, असा सवाल शरद पवारांनी केला आहे. सुरूवातीला अॅण्टी करप्शन दोन वेळेस ईडीने धाडी टाकल्या, एकाच विषयावर तीन वेळेस एकाच व्यक्तीच्या घराला, संस्थेला आणि नातेवाईकांना का धाडी टाकून त्रास दिला जात आहे, असा सवाल देखील पवारांनी केला.
सखोल चौकशीला संपूर्ण सहकार्य करा -पवार
चौकशीला सामोरे जा, त्यांना हवी ती माहिती द्या, सुरू असलेल्या सखोल चौकशीला संपूर्ण सहकार्य करा, तुमची भूमिका स्पष्ट असल्याने चिंता करण्याची आवश्यकता नाही, सखोल चौकशीच्या कामाला संपूर्ण सहकार्य करा, असंही यावेळी शरद पवारांनी सांगितलं.
दरम्यान, नाशिकमध्ये समीर भुजबळ समर्थकांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी बळाचा वापर करून १०० पेक्षा अधिक कार्यकर्ते ताब्यात घेतले, या कार्यकर्त्यांनी नाशिकच्या द्वारका चौकात रस्तारोको केला होता.