मुंबई : होय नाय होय म्हणत अखेर शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झालाय.
मुंबईत शिवसेना-भाजप नेत्यांच्या बैठकीत युतीबाबत निर्णय झाला. सुभाष देसाई आणि रावराहेब दानवे यांच्यात ही बैठक झाली. या बैठकीनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यात बैठक होऊन युतीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.
दरम्यान, युती जरी होत असली तरी युतीचा नवा फॉम्युला काय असेल, याबाबत अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. निवडणूक प्रचारात दोघांनीही एकमेकांची उणी-धुणी काढली. तसेच निकालानंतर भाजपने आमचीच सत्ता येईल आणि महापौरही आमचाच असेल, असे भाकित केले होते. त्यामुळे शिवसेनेने टोकाची भूमिका घेतली होती. युतीच्या गोंधळामुळे मनसेला महत्व आले होते. भाजपचा निर्णय झाला असेल तर आमचा निर्णय आम्ही घेऊ, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे युती होणार नसल्याचे संकेत मिळाले होते.
युतीत तणाव निर्माण झाल्याचे दिसल्याने ठाकरे बंधुंचे मामा चंदूमामा वैद्य यांनी पुढाकार घेत राज-उद्धव या दोघा भावांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. त्याचवेळी मनसेनेने एक नगरसवेक गळाला लावत १० जणांचा वेगळा गट स्थापन केला आणि कोकण आयुक्तांना तसे पत्र दिले. त्यामुळे मनसेला खेचण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत चढाओढ निर्माण झाली होती. त्याचवेळी युती झाल्याचे वृत्त धडकले आणि कल्याण-डोंबिवलीतील तिढा संपल्याचे स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.