मुंबई : शिवसेना भाजप युतीत कुरघोडींचा सिलसिला अजूनही सुरुच आहे. सरकारच्या कारभारावरुन भाजपला लक्ष्य करण्याचं शिवसेनचं पुढचं पाऊल म्हणजे उद्धव ठाकरेंनी आखलेली विदर्भातली शिवसंपर्क मोहीम... या मोहिमेआडून भाजपला लक्ष्य करण्याची व्यूहरचना आखण्यात आलीय.
शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत विदर्भात अपेक्षित यश मिळालं नाही. त्यातच भाजपचा यशाचा आलेख दिवसेंदिवस वाढता राहिलाय. त्यामुळे उद्धव ठाकरे अस्वस्थ आहेत. भाजपला तगडी टक्कर देण्यासाठी त्यांनी आता थेट भाजपच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच विदर्भात आपले शिलेदार धाडलेत. शिवसेनेच्या या नव्या मोहिमेचं नाव आहे शिवसंपर्क.... या मोहिमेसाठी पुढचे पाच दिवस शिवसेना नेते आणि प्रमुख पदाधिकारी विदर्भात तळ ठोकून असणार आहेत. या मोहिमेचे संघटनात्मक आणि राजकीय असे दोन भाग करण्यात आलेत. नेत्यांनी विदर्भाबद्दलचा अहवाल सादर केल्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः विदर्भाचा दौरा करणार आहेत.
या मोहिमेच्या संघटनात्मक भागात पक्षाच्या पराभूत उमेदवारांच्या अपयशाची कारणमिमांसा करण्यात येणार आहे तसंच संघटनात्मक परिस्थितीचा आढावा घेताना पदाधिकारी नेमणुकीची योग्यता आणि सत्यताही पाडताळून पाहाणार आहेत... तर मोहिमेच्या राजकीय भागात जिल्ह्यातल्या भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकदीशी शिवसेनेच्या ताकदीची तुलना केली जाणार आहे. मोहिमेचा मुख्य भाग हा भाजपप्रणित सरकारला लक्ष्य करणारा आहे. त्यानुसार, निवडणुकीच्या काळात भाजपकडून करण्यात आलेल्या विविध घोषणा, जिल्ह्यातली विकासकामं, प्रकल्प यासंदर्भाल्य़ा घोषणांचा पाठपुरावा करण्यात येईल. त्याही पुढे जात या घोषणा पूर्ण करायला सरकारला भाग पाडणं. प्रसंगी त्यासाठी आंदोलनाची व्यूहरचनाही आखण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
भाजपप्रणित सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली असली तरी सापत्न वागणुकीमुळे सत्तेत शिवसेना अस्वस्थ आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि सत्तेत सहभागी झालेले शिवसेनेचे मंत्री भाजप सरकारला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नाहीये. वेगळा विदर्भ, जैतापूर अशा मुद्यांवर शिवसेना-भाजपमधले मतभेद याआधीच चव्हाट्यावर आलेत. मुंबईसह प्रमुख महापालिकांमध्ये सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान शिवसेनेपुढे आहे. त्यामुळे शिवसेना नेतृत्वानं भाजपवर दबाव ठेवण्यासाठी शिवसंपर्क मोहिमेच्या आडून कुरघोडीची ही नवी खेळी केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.