मुंबई : एकीकडे शिवसेना नेते आक्रमक झाल्याची चर्चा असतानाच भाजपानं मात्र आता सबुरीची भाषा केली आहे. शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी याबाबत जिल्हास्तरावर निर्णय होतो. मात्र मुंबईमध्ये युती व्हावी ही भाजपाची इच्छा असल्याचं अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपवर विश्वास ठेवणं कठीण असल्याचा सूर आज मातोश्रीवर झालेल्या शिवेसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचप्रमाणे या निवडणुका स्वबळावर लढण्याचीही सर्वांची भावना उद्धव ठाकरेंसमोर व्यक्त करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंनीही या भूमिकेला पाठिंबा असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. बैठकीत याआधी भाजपसोबत लढून काय मिळालं? जयललिता, लालूप्रसाद, ममता बॅनर्जी भाजपशिवाय लढून सत्ता मिळवतात, मग शिवसेना का मिळवू शकणार नाही असंही या बैठकीत उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलंय.