‘ती’ बनून व्यापाऱ्यांना लावला चुना!

मुंबईतल्या एका बड्या व्यापाऱ्याला इंटरनेटच्या माध्यमातून लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केलीय.

Updated: Feb 16, 2013, 09:49 AM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईतल्या एका बड्या व्यापाऱ्याला इंटरनेटच्या माध्यमातून लाखो रुपयांचा चुना लावणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणाला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. निखिल लाल असं या आरोपीचं नाव असून तो अहमदाबादचा रहिवाशी आहे. निखिलनं मुलगी असल्याचा बनाव करत कपड़े व्यापाऱ्याची फसवणूक केलीय.
मुंबई क्राईम ब्रांचच्या ताब्यात असलेल्या निखील लाल या आरोपीला त्याच्या आई-वडीलांनी मोठ्या कष्टानं ‘एमबीए’पर्यंत शिक्षण दिलं. एमबीए झाल्यानंतर मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहील पैसे कमावेल आणि आपल्याला सुखी ठेवेल, असं त्याच्या पालकांनी स्वप्न बघितलं. मात्र, त्यानं पैसा कमावण्यासाठी शिक्षणाचा लोकांना फसवण्यासाठी वापर केलाय.

मूळचा अहमदाबादच्या निखीलनं इंटरनेटवर स्वतःची ओळख मुलगी अशी दाखवली आणि मुंबईतल्या एका मोठ्या कपडा व्यापाऱ्याला लाखोंचा चुना लावला. निखिलला कोर्टानं एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावलीय. निखिलनं मुंबईतल्या व्यापाऱ्याला फसवण्याआधी आणखी तीन जणांची अशाच पद्धतीनं फसवणूक केल्याचं उघड झालंय.