Himachal Pradesh Snowfall Video : महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून थंडीचा कडाका वाढलेला असतानाच या थंडीची खरी मौज सुरुय ती म्हणजे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये. याच राज्यांपैकी पर्यटकांच्या आवडीचं एक ठिकाण म्हणजे हिमाचल प्रदेश. या राज्यातील प्रत्येक गावाचं प्रत्येक पाड्याचं आपलं असं एक वेगळेपण आहे. अशाच या हिमाचल प्रदेशमध्यचे असणाऱ्या भारतातील सर्वात शेवटच्या गावात नुकतीच यंदाच्या मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली.
मोसमातील पहिलीवहिली बर्फवृष्टी म्हणजे इथं जणू एक सोहळाच असते. त्यामुळं देशातील शेवटच्या गावामध्ये झालेला हा सोहळासुद्धा तितकाच खास होता. शुभ्र चादरीचं अच्छादन असणाऱ्या या अद्भूत गावातं नाव आहे सांगला. पर्यटक आणि ट्रेकिंगवेड्या मंडळींसाठी हे ठिकाण सांगला व्हॅली म्हणूनही ओळखलं जातं.
सांगला व्हॅलीमध्ये नुकत्याच झालेल्या बर्फवृष्टीमुळं इथल्या घरांसह डोंगररांगांवर बर्फाची चादर तयार झाली आहे. झाडांच्या हिरव्या पानांवर बर्फाचं शुभ्र अच्छादन तयार झालं आहे. चिंचोळ्या वाटा असो किंवा घरांची छतं असो, नजर जाईल तिथे फक्त आणि फक्त बर्फच पाहायला मिळत आहे.
समुद्रसपाटीपासून साधारण 8900 फूट इतक्या उंचीवर असणारं हे गाव बस्पा नदीच्या किनाऱ्यावर वसलं असून, हिमाचल प्रदेशातील किन्नौर क्षेत्रात असून इथं येऊन वेगळाच थरार आणि वेगळीच संस्कृती अनुभवता येते. एकिकडे जिथं मनाली, शिमलासारख्या ठिकाणांवर पर्यटकांची तोबा गर्दी असते तिथेच हिमाचलमध्येच असणारी सांगला गावांसारखी ठिकाणं साहसप्रेमींसाठी पर्वणी ठरतात. ट्रेकिंग, कॅम्पिंग, रिव्हर राफ्टींग, माऊंटन बायकिंग या आणि अशा कैक गोष्टी इथं करता येतात. अगदी काहीच नाही, तर फक्त इथं भेट देऊन निसर्गाची क्षणाक्षणाला बदलणारी रुपं पाहण्यातही बराच वेळ निघून जातो.
हिमाचल प्रदेशातील तिबेट सीमेनजीकच सांगला हे गाव आहे. शिमल्यापासून या गावातं अंतर साधारण 220 किमी असून, रस्ते मार्गानं इथं पोहोचता येतं. सांगलाच्याच नजीक किन्नौर व्हॅलीतील कल्पा शहर असल्यामुळं या गावाला ट्विन सिटीसुद्धा म्हटलं जातं. शिमल्याहून निघणारा एक रस्ता रामपूरमार्गे सांगला व्हॅलीपर्यंत येतो. यादरम्यान तुम्ही नारकंडा आणि रामपूरलाही थांबू शकता.