मुंबई : गिरगावातील फणसवाडी भागात असणाऱ्या जव्हार मॅन्शनमधील ४० फूट खोल बोअरवेलमध्ये दोन व्यक्ती पडल्याची घटना रविवारी सकाळी घडली.
या घटनेनंतर स्थानिकांनी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास अग्निशमन दलाला ही घटना कळवल्यानंतर १२.३० मिनिटांनी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
बोअरवेलचा खड्डा खोल असल्याने त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा होण्याची गरज होती. त्यामुळे प्रथम त्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला. त्यानंतर शिड्या आणि दोरखंडांचा वापर करुन त्यांनी या खड्ड्यात असणारा धोकादायक गॅस बाहेर काढण्याची सोय केली.
उपअग्निशमन अधिकारी बोरोळे, अतिरिक्त अग्निशमन अधिकारी डिसूझा, स्टेशन ऑफिसर सुर्वे आणि स्टेशन ऑफिसर उबाळे यांच्या पथकाने ही मोहीम केली. हे चालू असतानाच एक बचाव वाहन आणि अॅम्ब्युलन्स यांना पाचारण करण्यात आले. दोन्ही व्यक्तींना बाहेर काढण्यात आले. मात्र, नायर हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.