www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा शहरात शेकडो गुंतवणूकदारांना बंटी-बबलीने फसविले आहे. `मनी मंत्र` नावाची एक शेअर गुंतवणूक करणारी कंपनी स्थापून या कंपनीने सुमारे ९० कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.
गुंतवणूकदारांना परतावा देण्याची वेळ येताच बंटी-बबली फरार झाले आहेत. गोमती पंचभाई आणि तिचा पती राकेश वरपटकर यांनी ही फसवणूक केली आहे. सुमारे सव्वा वर्षापूर्वी या कंपनीची स्थापना झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा शहरातल्या नेहरू चौक भागात या कंपनीचं कार्यालय आहे.
गेले सव्वा वर्ष शेकडो गुंतवणूकदारांकडून सुमारे ९० कोटी रू. जमा केले. यात रक्कम दामदुप्पट करणे, मासिक ठेव जमा करणे, एकरकमी गुंतवणूक करणे असे अनेक पर्याय देण्यात आले. यातील गोमती ही तिशीतील तरुणी राजूरा येथील एका बड्या राजकीय घराण्याशी संबंधित असल्याने लोकांनी विश्वास ठेवत लाखोंच्या रकमा अत्यंत विश्वासाने या दाम्पत्त्याला दिल्या. सुरूवातीला विश्वास वाढीस लागावा यासाठी कंपनीने काही लोकांना लाखोंचे परतावे दिले.
मात्र नंतर कंपनीच्या बंटी-बबलीने आपला खरा रंग दाखविला. कंपनीचे धनादेश बाउन्स झाले. परतावे दीड दीड महिना खोळंबले. बँकांनी हात वर केले. मग मात्र गुंतवणूकदारांचा धीर खचला. खचलेल्या गुंतवणूकदारांनी प्रकरण पोलिसात नेले. पोलिसांनी सध्या याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला असून कोटीच्या कोटी घोटाळे करणा-या गोमती पाचभाई व तिचा पती राकेश वरपटकर यांचा शोध घेतला जात असल्याची मोघम माहिती दिली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ