www.24taas.com , झी मीडिया, नागपूर
उत्तरप्रदेशात मायवतींनी राबवलेल्या सोशल इंजिनियरिंग फॉर्म्युल्याचं नागपुरात भाजपनं अनुकरण केलंय. भाजपनं नागपूर महापालिकेचं उपमहापौरपद जैतुनबी अश्फाक पटेल या मुस्लिम नगरसेविकेला बहाल केलं. आज झालेल्या निवडणुकीत पटेल यांनी बसपाच्या शबाना परवीन मोहम्मद जलाल यांचा 46 मतांनी पराभव केला. मावळते उपमहापौर संदीप जाधव यांच्याजागी पटेल यांची निवड झालीय.
भाजपाच्या जैतुनबी अश्फाक पटेल अन्सारी यांनी उपमहापौरपदाच्या निवडणुकीत त्यांनी बसपाच्या शबाना परवीन मोहम्मद जलाल यांचा 46 मतांनी एकतर्फी पराभव केलाय. जलाल यांच्याबाजूनं बसपाच्या सर्व नगरसेवकांनी मतदान केलं असलं तरी राष्ट्रवादीच्या 6 पैकी 4 आणि काँग्रेसच्या 41 पैकी 21 नगरसेवंकांनीच परवीन यांना मत दिलं.
भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी नागपुरातून आगामी लोकसभा निवडणूका लढवणार आहेत. त्याच तयारीचा भाग म्हणून भाजपनं मुस्लिम मतांसाठी व्यूव्हरचना सुरु केलीय. मागच्या वेळी उपमहापौर निवडणुकीत मुस्लिम उमेदवाराला विरोध करणाऱ्या भाजपला केवळ मतांसाठीच मुस्लिम समाजाची आठवण झाली असा आरोप विरोधकांनी केलाय.
मावळते उपमहापौर संदीप जाधव दलित समाजाचे आहेत. त्यामुळं जैतुनबी अश्फाक पटेल अन्सारी यांना उपमहापौर करत भाजपनं सोशल इंजीनियरिंग चा फॉर्म्युला नागपुरात राबवला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.