www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
गेले काही दिवस सतत कोसळणाऱ्या पावसाने विदर्भात सर्वत्र धुमाकूळ घातलाय. विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालंय.
वर्धा नदीला आलेल्या पुराने चंद्रपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणाचे सर्वच म्हणजे सातही दरवाजे १.२५ मीटरने उघडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर-अहेरी मार्गही बंद झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. वैनगंगा नदीने धोक्याची पातळी पार केल्याने गोसीखुर्द धरणाचे ३३ पैकी ३२ दरवाजे उघडण्यात आले आहे.
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील अनेक गावामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. अकोला जिल्ह्यात वाण धरणाचे ६ पैकी ४ दरवाजे उघडण्यात आलेत, तेल्हारा तालुक्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. यवतमाळ जिल्ह्यात अरुणावती धरणाचे १२ पैकी ११ दरवाजे उघडण्यात आलेत. जिल्ह्यातील आर्णी शहरात पावसाचं पाणी ५०० घरात आणि बाजारपेठेत पाणी शिरलंय. खुनी नदीला पूर आल्याने पांढरकवडा मधील एक हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.
येत्या ४८ तासात वेधशाळेने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे विदर्भात पूरस्थिती निर्माण होईल अशी शक्यता आहे.
कोयनेचंही पाणी सोडलं...
विदर्भात अशी स्थिती असताना सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचे सर्व दरवाजे दोन फुटांनी उघडले आहेत. ११ हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग केला जातोय. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.