www.24Taas.com, झी मीडिया, नाशिक
एकीकडे नाशिकमधल्या खड्ड्यांवरुन सत्ताधा-यांवर प्रचंड टीका होतेय. तरीही खड्डे नीट बुजवले जात नाहीत. त्याचवेळी नाशिकमधल्या कॉलेजच्या विद्यार्थिनीनं पॉकेटमनीमधून कॉलेजजवळचे खड्डे बुजवलेत.
नाशिकच्या देवळाली कॅम्प परीसरातल्या भाटिया कॉलेजची ही विद्यार्थिनी वैशाली मोजाड. या विद्यार्थिनीनं भल्याभल्या लोकप्रतिनिधींना लाजवेल असं काम केलंय. देवळाली कॅम्प परिसरातल्या खड्ड्यांचा विद्यार्थ्यांना त्रास होत होता. पण त्याकडे कुणीही लक्ष देत नव्हतं. अखेर वैशालीनंच तिच्या पॉकेटमनीमधले पैसे साठवले आणि त्या पैशांतून खड्डे बुजवले.
नाशिक महापालिकेचे लोकप्रतिनिधी लाखो रुपयांची उधळण फक्त चहा नाश्त्यावर करत असल्याचं धक्कादायक वास्तव नुकतंच झी मीडियानं समोर आणलं होतं. मोठ्यांची असली उदहारणं समोर असताना या विद्यार्थिनीनं मात्र पोट भरण्यापेक्षा खड्डे बुजवायला प्राधान्य दिलंय.
पॉकेटमनीतून रस्त्यावरचे खड्डे बुजवून या विद्यार्थिनीनं खारीचा वाट उचललाय. तिच्या मदतीला इतरही विद्यार्थी पुढे आलेत. पण जे लहानग्यांना करावसं वाटलं, ते ज्यांच्या हातात सत्ता आहे अधिकार आहे, त्यांना का वाटत नाही आणि जर वाटतं तर ते कृतीतून का दिसत नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.