www.24taas.com, नाशिक
नाशिक जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आता एमबीए होऊ लागलेत. मुक्त विद्यापीठानं त्यांना ही संधी उपलब्ध करून दिली आहे. दोन वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या अभ्यासक्रमात तीन अधिकारी उत्तीर्ण झाले असून या वर्षभरात अजून दहा अधिकारी व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहेत.
नाशिक जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकारी सध्या व्यवस्थापनाचे धडे घेत आहेत. नाशिकमधल्या उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब बुधवंतही मुक्त विद्यापीठाच्या एमबीएच्या अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेत. नाशिक पोलीस आयुक्तालयाचा नियंत्रण कक्ष सांभाळत त्यांनी ‘ह्युमन रिसोर्स’ या विषयात व्यवस्थापनातील पदवी संपादन केलीय.
बुधवंत यांच्याप्रमाणेच राज्यातील एकूण अठ्ठावीस अधिकारी सध्या व्यवस्थापनाचं शिक्षण घेत आहेत. कामाच्या व्यापामुळे अनेकांचे प्रोजेक्ट अपूर्ण राहिल्यामुळे अनेकांचे निकाल राखून ठेवण्यात आलेत. मात्र, तीन जणांना ही पदवी पटकावण्यात यश मिळालंय. घरबसल्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने पोलिसांबरोबर डबेवाले, शिंपी, रिक्षा चालक आणि इतर व्यावसायिकांसाठीही पदविका सुरु केल्या आहेत.