नाशिकमध्ये वृक्षतोड... पर्यावरणाची ऐशी-तैशी!

नाशिकमध्ये सर्रास वृक्षांची कत्तल केली जातेय. मात्र लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिका-यांना त्याच्याशी काहीही सोयरसुतक नाही.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 5, 2013, 08:00 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकमध्ये सर्रास वृक्षांची कत्तल केली जातेय. मात्र लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिका-यांना त्याच्याशी काहीही सोयरसुतक नाही. शहरातल्या वृक्षांसाठी वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आलीय. मात्र ही समिती केवळ कागदावरच असल्यानं शहराच्या कारभा-यांचं पर्यावरण प्रेम आटलं की काय असा प्रश्न नागरिकांना पडलाय.
कालिदास कलामंदिरा समोर असणारा हा विशाल वटवृक्ष आठ दिवसांपूर्वी कोसळला. गेल्या अनेक पिढ्यांना मायेची सावली देणा-या या आधारवडाखाली दबून एका महापालिका कर्मचा-याचा मृत्यू झाला. महापालिकेनं या वृक्षाकडे लक्ष दिलं नसल्यानं अँसिड टाकून हा वृक्ष पाडण्यात आल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी करतायत. म्हणूनच वटवृक्ष कोसळण्याचं कारण शोधण्यासाठी वृक्षाचं पोस्टमोर्टेम करावं आणि संबंधित अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होतेय. वृक्षप्रेमींना झाडांविषयी तळमळ असली तरी लोकप्रतिनिधी आणि अधिका-यांना त्या विषयी सोयरसुतक नाही.
महापालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना झाली. वृक्षांची बेसुमार होणारी कत्तल थांबवणं, वृक्षांची गणना, वृक्षांचं पुनर्वसन आणि संवर्धन करणं अशी कामं समितीच्या माध्यमातून अपेक्षित आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यात महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असणा-या या समितीची एकही बैठक झाली नाही. म्हणजेच गेल्या दीड वर्षांपासून वृक्ष प्राधिकरण समितीचं काम बंद आहे. अधिकारी आणि लोकप्रतीनिधींना यातून मिळण्यासारखं काहीच नसल्यानं प्राधिकरण समितीकडे कुणी फिरकत नाही. याविषयी आयुक्तांनी बोलायला नकार दिला, तर सत्तधारी स्वतःचा बचाव करतायत.
राजकारणात आपली नव्यानं ओळख निर्माण करण्यासाठी मनसेनं पर्यावरण सेलची स्थापना केली. मात्र मनसेच्या सत्ताकाळातच वृक्ष प्राधिकरण समिती लयास गेलीय. `आपलं हरित नाशिक` या महापालिकेच्या बोधवाक्यापासूनच सत्ताधा-यांनी फारकत घेतली की काय, असा प्रश्न नाशिककरांना पडलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.