फिफा वर्ल्डकप 2014 : आज इटली X कोस्टा रिका

आज इटली आणि कोस्टा रिका दरम्यान लढत रंगणार आहे. चार वेळेची वर्ल्ड चॅम्पियन इटली कोस्टा रिकाच्या तुलनेत बलाढ्य आहे

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 20, 2014, 12:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आज इटली आणि कोस्टा रिका दरम्यान लढत रंगणार आहे. चार वेळेची वर्ल्ड चॅम्पियन इटली कोस्टा रिकाच्या तुलनेत बलाढ्य आहे. मात्र, वर्ल्ड चॅम्पियन उरुग्वेला पराभूत करण्याची किमया करणाऱ्या कोस्टा रिकालाही कमकुवत मानून चालणार नाही.
`ग्रुप ऑफ डेथ` असलेल्या `डी` ग्रुपमधील इटली आणि कोस्टा रिकामध्ये कोण बाजी मारतं, याकडेच आज तमाम फुटबॉल फॅन्सच लक्ष लागून राहिलंय. इटलीने इंग्लंडला तर कोस्टा रिकाने उरुग्वेला पराभूत करत स्पर्धेत विजयी सलामी दिलीय. यामुळे ग्रुपमधील अव्वल स्थानासाठीची ही लढाई असणार आहे.
पहिल्या मॅचमध्ये इंग्लंडला 2-1ने पराभूत करणाऱ्या इटलीसाठी स्पर्धेतील हा पहिला सोपा मुकाबला असणार आहे. इटलीचा स्टार स्ट्रायकर मारियो बालोटेली हाच पुन्हा `सेन्टर ऑफ द अॅट्रॅक्शन` राहणार आहे. गेल्या 12 मॅचेसमध्ये त्याने 8 गोल करण्याची किमया केलीय. इंग्लंडविरुद्धही त्याने हेडरने केलेला गोल विजयी गोल ठरला होता. यामुळे कोस्टा रिकाला बालोटेलीकडूनच सर्वाधिक धोका असणार आहे. याशिवाय आंद्रेय पिर्लो या मिडल्फडरनेही इंग्लंडविरुद्ध दमदार खेळाच प्रदर्शन केलं होतं.
इटलीचा गोलकिपर गिनलुईगि बफन दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या मॅचला मुकला होता. या मॅचमध्येही त्याच्या समावेशाबाबत साशंकता आहे. त्याच्या स्थानी पुन्हा एकदा सालव्टोर सिरिगु गोलकपिंग करण्याची शक्यता आहे. तर कोस्टा रिकाने वर्ल्ड चॅम्पियन उरुग्वेचा 3-1 ने धक्कादायक पराभव करत वर्ल्ड कपमधील पहिला अप सेट केला. यामुळेच जरी आपल्याला इटली बलवान टीम वाटत असली तरी कोस्टा रिकाही काही कमी नाही.
जोएल कॅम्पबेल हा फॉडवर्ड प्लेअर आणि ख्रिस्तियन बॉलानॉस हा मिडफिल्डर कोस्टा रिकाचे सरप्राईज पॅकेज आहेत. दोघांनीही उरुग्वेविरुद्ध गोल झळकावत कोस्टा रिकाला पहिला मोठा विजय मिळवून मोलाच योगदान दिलंय. याशिवाय त्यांचा गोलकिपर केयलॉर नावास यानदेखील उरुग्वेविरुद्ध चांगला खेळ केलाय. आता उरुग्वेसमोर इटलीच्या डिफेन्सला भेदण्याचं आव्हान असणार आहे.
कोस्टा रिका वर्ल्ड कपमध्ये कधीही सलग मॅचेस जिंकू शकलेली नाही. आता इटली इतिहास कायम राखते की कोस्टा रिका इतिहास बदलते हे पाहण रंगतदार ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.