www.24taas.com, पुणे
जनतेच्या हिताला प्रथम प्राध्यान्य देणं, हे राज्यकर्त्यांचं कर्त्यव्य समजलं जातं. उपुख्य्मंत्री अजित पवार यांच्या बाबतीत मात्र अगदी याच्या विरुद्ध अनुभव पुणेकरांना येतोय. दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर असलेल्या पुण्यात सीसीटीव्ही बसवण्यास मुहूर्त मिळत नाही. मात्र, अजित पवार यांनी, ते राहत असलेल्या भोसले नगर परिसरात सीसीटीव्हीचं जाळं उभारला आहे. तेही महापालिकेच्या पैशातून...
पुण्यातला हा भोसले नगरच्या परिसरात सीसीटीव्हींचं अक्षरशः जाळं पसरलंय. मात्र असे सीसीटीव्ही पुण्यात इतर ठिकाणी दिसत नाहीत. मग याच परिसरात महापालिकेनं सीसीटीव्ही का बसवले? असा प्रश्न स्वाभाविकच पडतो. त्याचं उत्तर मिळतं एका घराच्या पत्त्यातून... जिजाई २१... हा बंगला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा. या परिसरात महापालिकेनं असे २० कॅमेरे लावले आहेत. त्याचं व्यवस्थित मॉनिटरिंगही होतंय.
अजित पवारांच्या घराच्या परिसरात भरपूर कॅमेरे लावण्यात आलेत. मात्र सामान्य पुणेकराच्या सुरक्षेचं काय? जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट, जंगली महाराज रस्त्यावरचे साखळी बॉम्ब स्फोटांनंतर पुण्यात सीसीटीव्ही बसवण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच केली होती.
शब्दाला एकदम पक्के... अशी अजित पवारांची ओळख आहे. दादांचं हे आश्वासन मात्र हवेत विरलंय. कारण सीसीटीव्ही बसवायला अजून तरी मुहूर्त सापडलेला नाही... कॅमेरे बसवलेत असं महापालिकेचे अधिकारी सांगतात, पण कॅमे-यासमोर बोलायला का तयार होत नाहीत, याचा उलगडा झालेला नाही.