www.24taas.com, झी मीडिया, पुणे
मान्सूनचं देशात तीन दिवसाआधी आगम होण्याची शक्यता आहे. मॉन्सून दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात सर्वसाधारणपणे 20 मे रोजी दाखल होतो. यंदा तो तीन दिवस आधीच डेरेदाखल होण्याची चिन्हे दिसून आली आहेत. अनुकूल हवामान असलं तर मान्सून वेेळेवर दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागने व्यक्त केला आहे.
नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) देशात दाखल होण्यास अनुकूल हवामान निर्माण झाले आहे. यामुळे पुढील तीन दिवसांत म्हणजेच 17 मेपर्यंत मॉन्सून दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात पोचण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
अनुकूलता कायम राहिल्यास मॉन्सून देशात आणि राज्यात सर्वसाधारण वेळेत पोचण्याची शक्यता आहे.
सर्वसाधारणपणे 20 मे रोजी मॉन्सून दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात दाखल होतो. यंदा तो तीन दिवस आधीच डेरेदाखल होण्याची चिन्हे आहेत.
देशात मॉन्सून एक जून रोजी सर्वप्रथम केरळमध्ये दाखल होतो. पाठोपाठ सात जूनपर्यंत तो तळकोकणात मजल मारतो. यानंतर 11 जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापून उत्तरेच्या प्रवासाला निघतो.
सर्वांत शेवटी 15 जुलैपर्यंत तो पश्चिम राजस्थानसह संपूर्ण देश व्यापतो. गेल्या वर्षी मॉन्सूनचा हा सर्वच प्रवास अतिशय वेगाने झाला होता.
दरम्यान, देशावर ठिकठिकाणी हवेचा दाब कमी झालेला असून, अनेक ठिकाणी चक्राकार वारे सक्रिय आहेत.
जम्मू- काश्मीरमध्ये पाकिस्तानलगतच्या भागात पश्चिमी चक्रावात सक्रिय असून, त्याचा हिमालयीन भागावर गुरुवारपर्यंत प्रभाव राहण्याचा अंदाज आहे.
हरियाणा आणि लगतच्या भागावर समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे सक्रिय असून, ते बुधवारी आणखी पूर्वेकडे सरकण्याचा अंदाज आहे.
याच वेळी पश्चिम बंगालचा हिमालयीन भाग व लगतच्या बिहारवरही समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्राकार वारे कायम आहेत. आसाम आणि मेघालयातही हवेच्या वरच्या थरात चक्राकार वारे सक्रिय आहेत.
हिमालयीन पश्चिम बंगालपासून झारखंड, सिक्कीम आणि ओडिशापर्यंतच्या भागात हवेच्या खालच्या थरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
गुरुवारी सकाळपर्यंत या पट्ट्याची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे. दक्षिण छत्तीसगडपासून तेलंगण, तमिळनाडू ते कन्याकुमारीच्या समुद्रापर्यंतच्या भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. याची तीव्रताही गुरुवारी सकाळपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे.
या सर्व हवामान स्थितीमुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पूर्वमोसमी पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत चेरापुंजी येथे सर्वाधिक 90 मिलिमीटर पाऊस पडला. यामुळे बहुतेक ठिकाणी कमाल तापमानात घट झाली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या उपमहासंचालक (हवामान अंदाज) डॉ. मेधा खोले म्हणाल्या, की मॉन्सूनचे मॉनिटरिंग करण्याचे काम 10 मेपासून सुरू आहे. त्यात प्रथमच मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची दिशा, वेग, पाऊस, ढगांचे प्रमाण इत्यादी हवामान घटकांची अनुकूलता दिसून आली.
नैर्ऋत्येकडून येणारे वारे स्ट्रॉंग आहेत. यानुसार 17 मेपर्यंत मॉन्सून दक्षिण अंदमान व बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात दाखल होण्यास अनुकूल स्थिती आहे.
उत्तर भारतात सक्रिय असलेल्या विविध सिस्टिममुळे उत्तर आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये ढगाळ हवामान व पावसामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. मात्र त्याचा मॉन्सूनच्या वाटचालीवर परिणाम होण्याची शक्यता नाही.
`वाऱ्याचा वेग, दिशा, ढगांचे प्रमाण आदी सर्व परिस्थिती पाहता मॉन्सून दक्षिण अंदमानात दाखल होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
मॉन्सून महाराष्ट्रापासून अद्याप फार दूर आहे. यामुळे उत्तर भारतात होत असलेल्या पूर्वमोसमी पावसाचा व घटलेल्या कमाल तापमानाचा मॉन्सूनवर परिणाम होणार नाही.``, असं भारतीय हवामानशास्त्र विभाग पुण्याच्या उपमहासंचालक डॉ. मेधा खोले यांनी म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.