www.24taas.com, पुणे
अवघा महाराष्ट्र दुष्काळानं होरपळतोय. सगळीकडं पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील मोराच्या चिंचोलीची परिस्थितीही वेगळी नाही. पाण्याच्या दूर्भिक्षामुळं इथल्या मोरांवरही स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे.
रणरणत्या उन्हात सुरू असलेली ही वणवण पाण्यासाठी आहे. दुष्काळाच्या तावडीतून मानवांबरोबरच मुके प्राणीही सुटले नाहीत. पाळीव जनावरांसाठी किमान चारा-छावण्या तरी सुरु आहेत. मात्र या मोरासारख्या पक्ष्यांचे प्रचंड हाल होत आहेत. मोरांचे सर्वाधिक प्रमाण असणा-या पुणे जिल्ह्यातील मोरांची चिंचोली या गावातले हे चित्र भयावह असं आहे. दुपारच्या वेळी झुडूपांच्या सावलीत पहुडण्याऐवजी मोरांना मात्र दुष्काळामुळं दाणापाणी मिळवण्यासाठी भर उन्हात रानोमाळ भटकावं लागतंय. इतकंच काय ज्या गावाशी त्यांचे जिवापलीकडचं नातं आहे. ते गाव सोडून जाण्याची वेळही त्यांच्यावर आलीय. चिंचोलीचे ग्रामस्थ मोरांचे स्थलांतर थांबवण्याचं सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
एरव्ही हा परिसर हिरवागार असतो. मोरांना खाण्यासाठी ज्वारी-बाजरीच्या कणसांनी शेतं भरलेली असतात. ओढ्या-नाल्यांत पिण्यासाठी पाणी असे. आता मात्र सारे काही शुष्क पडलंय. शेततळी, विहिरी, छोटे-मोठे पाणवठे कधी आटून गेलीयत. स्थलांतरामुळे मोरांची सुरक्षितता धोक्यात आलीय. दुर्दैवानं ही परिस्थिती गेली 3 वर्षे उद्भवतं आहे. मोरांचे स्थलांवर कायम राहिल्यास गावात आता आभाळात ढग दाटून आल्यावर आंब्याच्या वनात पिसारा फुलवून नाचणारे मोर दिसणार नाहीत. तसंच मोराच्या नावानं असलेली गावाची ओळखही दुष्काळामुळं पुसली जाईल.