www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातले बाल भिकारी चक्क कोट्यधीश आहेत.... दानशूर पुणेकरांनी भिकाऱ्यांना एवढे पैसे दिलेत की त्यांची वार्षिक कमाई चक्क चार कोटींवर पोहोचलीय...
मुंबईतल्या झोपडपट्टीत राहणारा जमाल मालिक कसा करोडपती होतो..... हे स्लमडॉग मिलेनिअरमध्ये आपण पाहिलं... पण आता पुण्याच्या कुठल्याही चौकात भीक मागणारा १०-१२ वर्षांचा मुलगा कोट्यधीश कसा होतो, त्याची धक्कादायक गोष्ट आम्ही सांगणार आहोत.... तुमच्या बँक बॅलन्सला मागं टाकेल, अशी त्यांची सेव्हिंग्ज आहेत. तुम्ही चेक बुकवर एवढी मोठी रक्कम कधी लिहीली नसेल, एवढी त्यांची कमाई आहे... पुण्यातल्या मैत्री फाऊण्डेशन आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी या सगळ्याचं सर्वेक्षण केलं. त्या सर्वेक्षणातून पुढे आलेले आकडे डोळे पांढरे करणारे आहेत.
पुण्यामध्ये एकूण ४८ चौकात ४८० बालभिकारी आहेत. या सगळ्यांची मिळून दिवसाची कमाई तब्बल १ लाख ६८ हजार, तर महिन्याची कमाई ३३ लाख ७४ हजार रुपये इतकी आहे. प्रत्येक मुलगा महिन्याला ७ ते ८ हजार रुपये कमावतो. आणि प्रत्येक मुलाची दिवसाची कमाई ३०० रुपये आहे. आणि या सगळ्याचा वार्षिक हिशोब लावायचा झाला तर भीक मागणाऱ्या छोट्या मुलांची वार्षिक कमाई आहे तब्बल ४ कोटी ४ लाख ८८ हजार रुपये.
भीक मागणाऱ्या ९१ टक्के मुलांचं प्राथमिक शिक्षणही पूर्ण झालेलं नाही. भीक मागणाऱ्यांमध्ये ३ ते १४ वयोगटातली मुलं जास्त आहेत. यामध्ये मुलांचं प्रमाण ४५ टक्के तर मुलींचं प्रमाण ५५ टक्के इतकं आहे. महत्त्वाचं म्हणजे यातली फक्त ८ टक्के मुलं अनाथ आहेत. अर्थात या सगळ्यामागे भिकाऱ्यांचं मोठं रॅकेट आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही.
बालमजुरीच्या विरोधात कितीही आरडाओरडा झाला तरी मिळेल तिथं आणि पडेल ते काम करणारी पोरं आजही दिसतात.... चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या पोऱ्यांना दिवसाकाठी १६० ते १७० रुपये मिळतात. तर उसाच्या रसाच्या गाड्यांवर काम करणाऱ्यांना दिवसाकाठी २०० रुपये मिळतात.... पण भिकाऱ्यांच्या कमाईपेक्षा दुर्दैवानं इज्जत की रोटीची कमाई कमीच भरतेय.
धट्ट्याकट्ट्या श्रीमंतीपेक्षा लुळीपांगळी गरीबी बरी.... कधी काळी ऐकू येणाऱ्या वाक्यांचं काळाच्या ओघात केव्हाच विसर्जन झालंय. त्याऐवजी लुळंपांगळं होऊन भीक मागितल्यावर श्रीमंती येते, या नव्या फंड्यावर भीक मागण्याचे धंदे उभे राहिलेत. पुण्यात आजमितीला ४८० बालभिकारी आहेत... आणि त्यांची कमाई चार कोटींच्या घरात आहे...
पुण्यातल्या अर्थकारणाचा हा प्रवास चक्रावून टाकणारा आहे. पुणेकर दानशूर आहेत, हे यामुळं सिद्ध होत असेलही... पण दुर्दैवानं ही दानशूरता भलत्याच लोकांच्या पथ्थ्यावर पडतेय... पुणेकरांनो, गरजवंताला नक्की मदत करा... पण यापुढं सिग्नलवर केविलवाणं तोंड केलेल्या एखाद्या भिकाऱ्याला पैसे देताना जरुर विचार करा... तो पैसा भलत्याच तिजोरीत जमा होतोय... आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक बालपण कुस्करलं जातंय...
अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ