www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
कोल्हापूरकरांचा टोल विरोधातला संताप काही कमी होताना दिसत नाही. आज टोल विरोधी कृती समितीनं शहरातून काढलेल्या महामोर्चाला नागरिकांना उत्स्फुर्त प्रतिसाद दिली. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यांनी संपूर्ण व्यवहार ठप्प ठेवून मोर्चाला पाठिंबा दिला. त्यामुळं संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आज बंद सदृश्य स्थिती होती.
देशात शहरातंर्गत रस्त्यांना कुठच टोल नाही मग कोल्हापूरकरांनी आय.आऱ.बी कंपनीनं केलेल्या निकृष्ठ दर्जाच्या रस्त्यांसाठी टोल का द्यायचा असा प्रश्न उपस्थित करत कोल्हापूरकर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले. टोल विरोधात अनेक आंदोलन होऊनही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण टोल लावण्यावर ठाम आहेत. त्यामुळं कोल्हापूरकरांच्या संतापात आणखीनच भर पडलीय. कोल्हापूरकरांचा रोष राज्य सरकारला पर्यायानं मुख्यमंत्र्यांना दाखवण्याच्या उद्देशानं शहरातून टोल विरोधातला महामोर्चा काढण्यात आला.
शहरातल्या गांधी मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या मोर्चामध्ये जिल्ह्यातले आमदार तसंच अनेक संघटना, संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
विराट महामोर्चामध्ये एक लाखाहून अधिक कोल्हापूरकर सहभागी झाले असल्याचा दावा टोल विरोधी कृती समितीनं केलाय. मुख्यमंत्र्यांनी आय.आर.बी कंपनीला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करु नये नाहीतर जनआंदोलनाचा रेटा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच जाईल असा इशारा जिल्ह्यातल्या आमदार, खासदारांबरोबर सर्वसामान्य नागरिकांनी दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.