www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
एका गरोदर महिलेला लवकर उपचार मिळावे, यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याविरोधात सोलापूरमधल्या शासकीय रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलंय. डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे १५०० रुग्णाचे आरोग्य धोक्यात आलंय.
सोलापूर शहरातल्या शासकीय रुग्णालयात रात्री १ वाजता जैनाबी पिरजादे नावाची महिला प्रसुतीसाठी दाखल झाली होती. ती हॉस्पिटलच्या आवारात गंभीर अवस्थेत होती. त्याच, दरम्यान सोलापूर शहरात अपघात झाला होता. पोलीस अधिकारी अरुण वाईकर यांनी अपघातग्रस्तांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. जैनाबी पिरजादे ही महिला डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलच्या आवारात तळमळत होती. मात्र, कुणीही डॉक्टर तिच्यावर उपचार करण्यास तयार नव्हतं. त्या महिलेची स्थिती पाहून वाईकर यांनी डॉक्टर पाटील यांना महिलेवर उपचार करण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी उपचारास नकार देत पोलिसांनाच अरेरावी केली. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करून या महिलेची प्रसुती करण्यासाठी डॉक्टरांना भाग पाडलं.
डॉक्टरांविरुद्ध पोलिसांनी बळाचा वापर केल्यामुळे ‘मार्ड’ संघटनेनं कामबंद आंदोलन पुकारलंय. डॉक्टर्सबाबत रुग्णांमध्ये चांगलीच नाराजी पसरलीय. मात्र, पोलिसांनी चांगलं काम केल्याबद्दल जनतेनं त्यांचे आभार मानलेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.