www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी- चिंचवड
चांगले अधिकारी सध्याच्या काळात मिळणं तसं अवघडच... पण असा एखादा अधिकारी मिळाला तर त्याला सरकार कडून चांगली वागणूक मिळतेच असं नाही.. पिंपरी चिंचवडमध्येही असंच घडलंय.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जकात विभाग प्रमुखपदी अशोक मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली. कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून नावलौकिक असलेल्या मुंडे यांनी जकात चोरीचं प्रमाण असं काही कमी केलं की पालिकेचं जकात उत्पन्न साडे सहाशे कोटींवरून थेट बाराशे कोटीं पर्यंत पोहचलं. अचानक जकात नाक्यांवर धाडी टाकणं, राजकीय दबावाला बळी न पडता काम करणं, यामुळे थोड्याच काळात मुंडे लोकप्रिय सुद्धा झाले आणि त्यांचे विरोधकही वाढले. सराफ व्यावसायिकांची जकात चोरी उघड करण्यात त्यांची कामगिरी अजूनही चर्चेचा विषय आहे. LBT लागू करण्याच्या निर्णयानंतर अशोक मुंडे यांनी तयार केलेलं मॉडेल थेट राज्य सरकारनं स्वीकारलं. पण चार वर्षं अतिशय शिस्तबद्ध आणि कर्तव्यदक्षपणे काम करणा-या या अधिका-याची आता बदली करण्यात आलीय. सरकारनं त्यांच्या बदलीचे आदेश तर काढलेत पण त्यांना कुठे पदभार स्वीकारायचा, हेच सांगितलं नाही.
मुंडे यांना सरकारकडून चांगली वागणूक मिळत नसल्यानं शहरातली बरीच मंडळी नाराज आहेत. जाहीर कार्यक्रमात वारंवार अशोक मुंडे यांची स्तुती करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार याकडे लक्ष देतील का असा सवाल विचारला जातोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.