www.24taas.com, झी मीडिया, रायगड
रायगड जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. जिल्ह्याच्या कर्जत, खालापूर, खोपोली परिसरात मुसळधार पावसाने रुद्ररूप धारण केल्याने पाताळगंगा नदीला महापूर आलाय. पाताळगंगा नदीकाठच्या भातशेतीत पाणी साचलंय. तर रत्नागिरी जिल्ह्यात पुराची स्थिती कायम आहे.
पाताळगंगा नदीला महापूर आल्याने रसायनी जवळील आपटा गावात दोन फूट पाणी शिरलंय. रसायनी आपटा मार्गे खारपाडा पेन हा मार्गावर नदीच्या पुराचे पाणी आल्याने महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. वाहतूक बंद पडल्याने एसटीच्या फे-या रद्द करण्यात आल्या. शाळकरी विद्यार्थी , कामगार यांचे प्रचंड हाल झाले.
कर्जत खोपोली रेल्वे सेवेवरही याचा परिणाम झाला. खालापूर, कर्जत, पेन, पाली या भागातील भातशेती पाण्याखाली गेलीय. एरवी आपत्ती व्याव्स्थापानेवर सतर्क असणारे महसुल आणि पोलिस प्रशासन प्रत्यक्षात काम करताना कुठेच दिसत नव्हते. खोपोली शीळ फाट्यावरील ट्रक पार्किंग आणि जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर पाताळगंगा नदीचे पाणी आले होते.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरलाय. रत्नागिरी तालुक्यातलं जनजीवन पूर्वपदावर येतंय. मात्र चिपळूण खेड, संगमेश्वर इथली पूरस्थिती कायम आहे. अजूनही पुर परिस्थिती असलेल्या भागात दोन फुटांपर्यंत पाणी आहे.
तसंच समुद्र अजुनही खवळलेला आहे. किना-यावर आजही मोठ्या लाटा धडकत आहेत. यामुळे समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.